ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अॅथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता
टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. टोकियो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आहे. भारत १९०० पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अॅथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ७ रजत आणि १२ कांस्य पदकं पटकावली आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात (१९००-१९३६)
भारताने सर्वप्रथम १९०० साली ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी भारताने फक्त एक स्पर्धक पाठवला होता. नॉर्मन प्रिचर्ड असं त्यांचं नाव होतं. त्यांनी पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि २०० मीटर हर्डल स्पर्धेत मेडल जिंकलं होतं. त्यानंतर भारताने प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला. १९२० मध्ये भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टीम पाठवली होती. त्यात ६ अॅथलीट आणि २ कुस्तीपटूंचा समावेश होता. १९२८ पर्यंत भारताला कोणतंच पदक मिळालं नाही. त्यानंतर १९२८ मध्ये भारताच्या हॉकी संघाने अम्सटर्डममध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. भारताने ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि अंतिम सामन्यात नेदरलँडला पराभूत केलं होतं. त्यानंतर १९३२ मध्ये भारताने अमेरिकेला २४-१ ने विक्रमी फरकाने पराभूत केलं होतं. ही विजय आजही स्मरणात आहे. बर्लिन ऑलिम्पिक १९३६ स्पर्धेमध्ये भारताने जर्मनीला ८-१ ने पराभूत केलं. त्यावेळेस भारत ब्रिटिश इंडियाकडून स्पर्धेत खेळत होता.
स्वातंत्र्योत्तर काळात (१९४८-२००)
स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. जागतिक महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा १९४८ मध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्ण पदक पटकावलं. स्वातंत्र्यानंतर भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक होतं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा वैयक्तिक पदक पटकावलं. कुस्तीपटू खाशबा दादासाहेब जाधव यांनी कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दुसरं सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६ मध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावलं. मात्र १९६० मध्ये भारतीय हॉकी संघाला पराभव सहन करावा लागला आणि रजत पदकावर समाधान मानावं लागलं. भारताने १९६४ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा हॉकीत सुवर्ण पदक पटकावत पुनरागमन केलं. १९६८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी टीमला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर १९७२ ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताला कांस्य पदक मिळालं. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं हे हॉकीमधलं शेवटचं पदक होतं.
१९८० नंतर थेट १९९६ मध्ये अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत लिएंडर पेसने टेनिसमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. भारताला टेनिसमध्ये मिळालं हे एकमात्र पदक आहे. त्यानंतर २००० साली सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींग स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. तिने २४० किलो वजन उचललं होतं. कर्णम देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी पहिली महिला अॅथलीट आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा (२००४-२०१६)
२००४ अँथेस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोर याने मेन्स डबल ट्रॅप शूटींगमध्ये रजत पदक पटकावलं. नेमबाजीतील हे भारताचं पहिलं पदक होतं. त्यानंतर २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने पहिलं सुवर्ण पदक पटकावलं. त्याने १० मीटर एअर रायफल कॅटेगरीत ७००.५ गुण मिळवत सुवर्ण पदक नावावर केलं. त्याचवर्षी सुशील कुमारनं कुस्तीत भारताला कांस्य पदक पटकावून दिलं. तसेच मुक्केबाजीत विजेंद्र सिंहने कांस्य पदक पटकावलं. २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने ६ मेडल जिंकले. विजय कुमारनं पुरुष गटातील जलद पिस्टल फायरिंग स्पर्धेत रजत पदक मिळवलं. गगन नारंगने १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक पटकावलं. सुशील कुमारने फ्रिस्टाइल ६६ किलो वजनी गटात रजत पदकावर मोहोर उमटवली. त्यानंतर योगेश्वर दत्तने फ्रिस्टाइल ६० किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. तसेच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉक्सर मेरीकॉमने कांस्य पदक मिळवलं.
२०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताच्या पदरी फक्त दोन मेडलची भर पडली. महिला फ्रिस्टाइल ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवलं. तर पीव्ही सिंधुने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रजत पदक पटकावलं. आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत काय कामगिरी करतो?, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.