जात पंचायतीच्या मनमानीविरोधात आता मदतवाहिनी, महाराष्ट्र अंनिसच्या मूठमाती अभियानाचा पुढाकार

close up employee man hand touching handset of telephone on desk for contact customer or receiving call , hotline concept

आता महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानने पुढाकार घेत मदतवाहिनी सुरू केली आहे.

नाशिक – पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतींची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे अधोरेखीत होत आहे. त्यामुळे वारंवार जात पंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षेची प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानने पुढाकार घेत मदतवाहिनी सुरू केली आहे.

महाराष्ट्र शासनाने सहा वर्षांपूर्वी जात पंचायतीच्या मनमानी विरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तयार केला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. परंतु, सरकारकडून त्याची अंमलबजावणी कठोरपणे होत नसल्याने या कायद्यान्वये राज्यात सहा वर्षांत केवळ १५० गुन्हे दाखल झाले आहेत. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील, जाती-जमातीतील लोकांना या कायद्याची माहिती नसल्याने पोलिसांकडे तक्रार येत नसल्याचे जात पंचायत मूठमाती अभियानाच्या लक्षात आले आहे.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

हे चित्र बदलण्यासाठी जात पंचायत मूठमाती अभियानने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. काही समाजात पोलीस ठाण्यात जाणे पाप समजले जाते. अनेक जाती अजूनही न्यायालयापर्यंत जात नाहीत. जात पंचायत ही समांतर न्याय व्यवस्था असल्याने लोकशाही कमकुवत बनते. अनेक जातीत न्यायनिवाडे अजूनही जात पंचायतमध्येच चालतात. त्यातूनच अमानुष प्रकार घडतात. यासाठी त्या समाजातील तरुणांना सोबत घेऊन प्रबोधन करण्याचे ठरवले असल्याचे जात पंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

प्रबोधनाला गती देण्यासाठी मूठमाती अभियानाने मदतवाहिनीचा ९८२२६३०३७८ हा क्रमांक जाहीर केला आहे. कुणालाही जात पंचायतविरोधी तक्रार करावयाची असल्यास संबंधित क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभर अभियानाचे कार्यकर्ते असल्याने सर्व भागांत मदतीसाठी कार्यकर्ते जागरुक असल्याचे चांदगुडे यांनी नमूद केले आहे.