जिल्हा परिषदेच्या ४१ शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटीचा निधी

राहुरी मतदारसंघातील, नगर-राहुरी-पाथर्डी या तीन तालुक्यातील ४१ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा ‘डिजिटल’ करण्यासाठी राज्य सरकारने १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

राहुरी, नगर व पाथर्डीतील शाळांना वितरण

नगर : राहुरी मतदारसंघातील, नगर-राहुरी-पाथर्डी या तीन तालुक्यातील ४१ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा ‘डिजिटल’ करण्यासाठी राज्य सरकारने १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येक शाळेला २ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषद शाळांना महानगरांच्या धर्तीवर शैक्षणिक सुविधा असलेल्या साधनांचा उपयोग, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. त्यादृष्टीने राहुरी मतदारसंघातील राहुरीसह नगर व पाथर्डी या तालुक्यातील शाळांना त्याचा लाभ होणार आहे.  सध्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याकरिता प्रत्येकी २ लाख २० हजार रुपये किमतीचे ५० संच मंजूर करण्यात आले आहेत. या शाळा डिजिटल झाल्यावर शाळेची गुणवत्ता व मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारून स्पर्धेच्या युगात त्यांना अधिक भरारी घेता येईल, अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली.डिजिटल होणाऱ्या शाळांमध्ये, राहुरी बुद्रुक ४, कणगर २, म्हैसगाव एक, वांबोरी २, तांदुळवाडी एक, वळण एक, कोंढवड २, सोनगाव २, धानोरे एक, सात्रळ ३, तांभेरे एक, कानडगाव एक, वरिशदे एक, ताहराबाद एक, गुहा एक, चंडकापूर एक, केंदळ खुर्द एक, केंदळ बुद्रुक १, शिलेगाव एक, तमनर आखाडा एक, डिग्रस एक, राहुरी खुर्द एक, चेडगाव एक, मोकळ ओहोळ एक, सडे एक, कापूरवाडी एक, इमामपूर एक, डोंगरगण एक, मांजरसुंबा एक, जेऊर एक, ससेवाडी एक, शेंडी एक, पोखर्डी गावठाण एक, मिरी एक, शिराळ एक, कोल्हार कोल्हुबाई एक, कामत शिंगवे एक, शिरापुर एक, सातवड एक, करंजी एक, डमाळवाडी एक या शाळांचा समावेश आहे. या शाळांना ५० संच वितरित करण्यास सुरुवात केल्याचेही तनपुरे यांनी सांगितले.