जिल्ह्यातील आठ धरणे तुडुंब: उर्वरित भरण्याच्या स्थितीत; नांदूरमध्यमेश्वरमधून २० टीएमसीहून अधिक पाणी प्रवाहित

सातत्याने सुरू असलेल्या कमी-अधिक पावसाने जिल्ह्यातील आठ धरणे तुडूंब भरली असून उर्वरित धरणेही पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत.

नाशिक : सातत्याने सुरू असलेल्या कमी-अधिक पावसाने जिल्ह्यातील आठ धरणे तुडूंब भरली असून उर्वरित धरणेही पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. पावसाच्या हंगामाला दोन महिने बाकी असल्याने जलाशय परिचालन सुचीनुसार गंगापूर, दारणासह अन्य प्रकल्पांत विशिष्ट मर्यादेत जलसाठा केला जात आहे. सद्यस्थितीत तुडुंब भरलेले आणि अन्य अशा एकूण १५ धरणांमधून विसर्ग केला जात आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत नांदूरमध्यमेश्वरमधून २० हजार १०५ दशलक्ष घनफूट म्हणजे २० टीएमसीहून अधिक पाणी प्रवाहित झाले आहे.

आठवडाभरापासून जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी नाशिक शहरासह अनेक भागात त्याने हजेरी लावली. काही भागात त्याचा जोर अधिक असला तरी काही भागात तो अधूनमधून हजेरी लावत आहे. अवघ्या काही दिवसात टंचाईचे संकट पूर्णपणे दूर सारले गेले आहे. जिल्ह्यातील लहान मोठय़ा धरणात सध्या ५० हजार ५४७ दशलक्ष घनफूट म्हणजे ७७ टक्के जलसाठा आहे. गतवर्षांचा विचार करता यंदा हे प्रमाण जवळपास अडीच पट अधिक आहे. मागील वर्षी याच काळात धरणांमध्ये २८ टक्के जलसाठा होता. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार भावली, आळंदी, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, चणकापूर, हरणबारी, केळझरसह नांदूरमध्यमेश्वर बंधाराही तुडूंब आहे. याशिवाय वालदेवी, गौतमी गोदावरी, पुणेगाव भरण्याच्या स्थितीत आहेत. दारणा (६५), मुकणे (७२), गंगापूर (६२), कश्यपी (६८), पालखेड (४९) अशा काही धरणांमध्ये जलाशय परिचालन सुचीनुसार जलसाठा नियंत्रित केला जात आहे. जास्तीचे पाणी सोडले जात आहे. सध्या दारणा, भावली, गंगापूर, कडवा, आळंदी, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, तिसगाव, नांदूरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी, दारणा, कादवासह अन्य लहान मोठय़ा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

पुरात वाहून गेलेल्या नऊपैकी दोघांचे मृतदेह सापडले
जिल्ह्यात नऊ ते १४ जुलै या कालावधीत नऊ जण पुरात वाहून गेले. यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन, सुरगाणा दोन, पेठ, नाशिक आणि मालेगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले आहेत. तळेगांव काचुर्ली येथे राहणाऱ्या पोपट गांगुर्डे यांचा शेतातील बांध पावसामुळे फुटला. तो पाहण्यासाठी ते शेतावर गेले. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ते घरी परत न आल्याने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. गांगुर्डे हे शेतातील फुटलेला बांध पाहण्यासाठी गेले असता किकवी नदीच्या पाण्यात वाहत गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाण्याच्या प्रवाहात त्यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला अडकल्याने हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत सुरगाणा येथील गंगाराम चौधरी (६०) हे सुरगाणा तालुक्यातील बोटा नदीच्या पात्रात वाहून गेले. या प्रकरणी बाऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पावसाने अनेक भागात घरांची पडझड होत आहे. चांदवडच्या दूधखेडा येथे विहीर खचली. सुरगाणा तालुक्यातील मौजे निंबारपाडा येथे बंधारा फुटून पिकांचे नुकसान झाले. निफाड येथेही विहिरीचे नुकसान झाले. पेठ तालुक्यातील सात रस्ते पाण्याखाली गेल्याने तर तीन रस्ते खचल्याने, दोन रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक बंद करावी लागली. अन्य भागातील काही रस्ते आजही पाण्याखाली आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह