जिल्ह्यातील शाळा तूर्तास बंद

शाळा सुरू करण्याबाबतचा जिल्हास्तरीय निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती.

नागरी क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश; ग्रामीण भागात १ डिसेंबरपासून वर्ग सुरू

पालघर :  पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक परिसर क्षेत्रातील नववी ते १२ इयत्तेदरम्यानच्या शाळा  ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उर्वरित ग्रामीण भागातील शाळा  शालेय व्यवस्थापन समितीला विश्वाासात घेऊन हे वर्ग १ डिसेंबरनंतर सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

शाळा सुरू करण्याबाबतचा जिल्हास्तरीय निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार, आमदार, वसई -विरार महानगरपालिका आयुक्त यांच्याशीदेखील यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

हे वाचले का?  सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र, पालघर, डहाणू व जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा व विक्रमगड नगर पंचायत क्षेत्र तसेच बोईसर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा सुरू करण्यात येऊ  नयेत असे सूचित करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत संमतीपत्र घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरू करण्याबाबतच्या स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात उल्लेख असून ई-लर्निंग सुविधा नसलेली ठिकाणे व मोबाइल नेटवर्कच्या अडचणी असलेल्या ठिकाणी शाळा प्राधान्याने सुरू करण्यात याव्यात, असे या आदेशात म्हटले आहे. ज्या गावांमध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही तेथे शाळा १ डिसेंबरनंतर सुरू करण्यात यावी, असे सूचित करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरू होणार असतील तेथील शिक्षकांनी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये  करोना चाचणी करून घेण्यात यावी,  पालकांनी आजारी पाल्यांना शाळेत पाठवू नये, परिस्थितीनुसार शाळेच्या मोकळ्या पटांगणात शाळेचे वर्ग भरवण्याचा प्रयत्न करावा,  निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात यावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात येऊ  नये असेदेखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत

ज्या ठिकाणी शाळा ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे त्या ठिकाणचा शाळेतील शिक्षकांनी करोना चाचणी करू नये,   विशेष म्हणजे ज्या गावाच्या शाळेवर नियुक्त असलेल्या शिक्षकाने त्याच गावात राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले असून जिल्हा आरोग्य विभागाने किमान पाच ते १० शाळांकरिता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे, असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे. निवासी आश्रमशाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तसेच समाज कल्याण विभागांतर्गत वसतिगृह आहे व इतर निवासी शाळा सुरू करण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येणार आहे.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन