करोनाच्या पार्श्वभूमीवर, आवश्यक त्या औषधांचा साठा, मुखपट्टींची विक्री वा तत्सम बाबींवर लक्ष ठेवले जात आहे.
- औषध दुकानाच्या जागी इलेक्ट्रीक दुकान
- अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नाशिक : औषधी दुकानाचा परवाना ज्या दुकानाचा आहे, तिथे इलेक्ट्रिकलचे दुकान, तर कुठे प्रार्थनास्थळ. काही ठिकाणी परवाना घेतलेल्या स्थळावर औषध दुकानच अस्तित्वात नाही. कुठे पहिल्या परवानाधारकाच्या जागेवर दुसरे औषधी दुकान. अशा अनेक बाबी अन्न आणि औषध प्रशासनाने जिल्ह्यात के लेल्या सर्वेक्षणात उघड झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर, १२ औषध दुकानांमध्ये ‘फार्मासिस्ट’ अर्थात औषधतज्ज्ञ नसल्याचे उघड झाले. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ६१ औषध दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर, आवश्यक त्या औषधांचा साठा, मुखपट्टींची विक्री वा तत्सम बाबींवर लक्ष ठेवले जात आहे. त्याअंतर्गत मुखपट्टींची शासनाने निश्चित केलेल्या दरात विक्री न केल्याप्रकरणी तीन औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. औषध दुकानांचे परवाने वा तत्सम कामासंबंधी अन्न आणि औषध प्रशासनाची ऑनलाइन व्यवस्था आहे. या व्यवस्थेत शहर, ग्रामीण भागातील काही औषध दुकानांमध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास येत होते. या अनुषंगाने अन्न औषध प्रशासनच्या पथकांनी ६१ औषध दुकानांचे सर्वेक्षण केले असता धक्कादायक माहिती उघड झाली. नियमानुसार औषध दुकानांमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट अर्थात औषधतज्ज्ञ बंधनकारक आहे. १२ दुकानांमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट नव्हते. म्हणजे औषधांचे ज्ञान नसणारी व्यक्ती त्यांची विक्री करीत होती. याची गंभीर दखल घेऊन संबंधित १२ दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावून परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये शहरातील सात, तर ग्रामीण भागातील पाच दुकानांचा समावेश असल्याचे या विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी सांगितले. ऑनलाइन प्रणालीत पाच ते सहा ‘फार्मासिस्ट’ दोन ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसले. म्हणजे एका दुकानातील नोकरी सोडून ते दुसरीकडे रुजू झाले तरी त्यांनी ती माहिती यंत्रणेला कळविली नाही. संबंधितांची एका ठिकाणची नोंदणी रद्द केली गेली.
या सर्वेक्षणात काही अनपेक्षित बाबी समोर आल्या. ज्या दुकानात औषधाचा परवाना घेतला गेला, तिथे प्रत्यक्षात इलेक्ट्रिकचे दुकान सुरू होते. मालेगावात परवाना घेतलेल्या स्थळावर प्रार्थनास्थळ असल्याचे औषध निरीक्षकांच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी परवाना घेतला, पण तिथे प्रत्यक्षात दुकानाच अस्तित्वात नव्हते.
काही ठिकाणी ज्या दुकानाच्या नावे एकाने परवाना घेतला, तिथेच दुसऱ्याने परवाना घेऊन दुकान सुरू असल्याचे आढळले. काही दुकानांच्या जागी केवळ मोकळी जागा होती. मुळात औषध दुकान बंद केल्यानंतर, जागा सोडल्यानंतर परवानाधारकाने त्याची माहिती देणे अभिप्रेत असते, परंतु संबंधितांनी तसे केले नाही. या संदर्भात ४९ औषध दुकानांच्या परवानेधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली. संबंधितांना परवान्याची उपयुक्तता नसल्याचा निष्कर्ष काढून ४९ औषध दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले.
जिल्ह्यातील ६१ दुकानांचे परवाने रद्द
शहर, ग्रामीण भागात एकूण ६१ औषध दुकानांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १२ दुकानांमध्ये फार्मासिस्ट अर्थात औषधतज्ज्ञ नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच अन्य ४८ औषध दुकानांना परवान्याची उपयुक्तता नसल्याचे निदर्शनास आले. या कारणावरून ६१ प्रकरणांत परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच मुखपट्टीची विक्री करताना शासन नियमांचे पालन न केल्यावरून तीन औषध दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. – माधुरी पवार (सहआयुक्त, अन्न-औषध प्रशासन)