राज्यपालांच्या दौऱ्याने चर्चेत आलेल्या गुलाबी गावाचा आंब्यासह फळबागांचे नुकसान झाले.
झाडे कोसळली, फळबागांचे नुकसान, दिवसभर विजेचा लपंडाव
नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सोमवारी शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात अनेक घरांचे पत्रे उडाले. पळसन येथे आरोग्य केंद्राचे नुकसान झाले. सुरगाणा, पेठ, सिन्नर तालुक्यांत आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. चांदवड तालुक्यात रंग महालाजवळ वीज तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला. तळेगाव येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने नाशिक-कळवण रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. शहरात हिरावाडी, नाशिकरोड भागात झाडे उन्मळून पडली. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता.
अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा प्रभाव जिल्ह्यात पडला. रात्रीपासून सोसाट्याचा वारा वहात होता. सकाळपासून अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम स्वरूपात तो बरसला. सकाळी शहरात १८ किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहत असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. वादळी वारा, पावसाने आदिवासी भागात अधिक नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यातील सांबरमल जिल्हा परिषद शाळेच्या चार खोल्यांचे पत्रे उडाले.
राज्यपालांच्या दौऱ्याने चर्चेत आलेल्या गुलाबी गावाचा आंब्यासह फळबागांचे नुकसान झाले. पळसन, अलंगून, हातरुंडी, मणी, वांगण परिसरात घरे, जनावरांचे शेड आदींचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात आंब्याची झाडे पडली. वादळामुळे कै ऱ्या पडल्याने त्या फु टल्या. घरांवरील पत्रे उडाले.
कांदा चाळीचेही नुकसान झाले. दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे रस्त्यावर झाड कोसळून नाशिक-कळवण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. चांदवड येथे रंग महालाजवळ वाहिन्यांवरील वीज तारा तुटल्या. याच परिसरात एक झाड मोटारीवर कोसळले. शहरात हिरावाडीसह नाशिकरोड विभागात पाच ते सहा ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. झाड रस्त्यात पडल्याने हिरावाडीत वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाने झाडाच्या फांद्या तोडून वाहतूक सुरळीत केली. नाशिकरोडच्या चेहेडी भागात झाडे पडली. या घटनांमध्ये सुदैवाने कुणी जखमी झाले नसल्याचे दलाकडून सांगण्यात आले.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, महावितरणने आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. परंतु, झाडांच्या फांद्या पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले. अनेक भागात सकाळपासून विजेचा लपंडाव सुरू होता.
वातावरणात गारठा
मेच्या मध्यावर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात कमालीचा गारठा पसरल्याने दिलासा मिळाला. परंतु, करोना काळात अकस्मात बदललेले वातावरण सर्दी, खोकला वा तत्सम विकारांना निमंत्रण देणारे ठरू शकते याची धास्ती आहे. सकाळी शहरासह इतरत्र पावसाच्या सरी पडल्या. शहरात सकाळी १८ किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग होता. रात्री ते सकाळपर्यंत एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी साडेआठ ते साडेअकरापर्यंत एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वारा आणि अधुनमधून रिपरिप यामुळे उकाड्यातून सुटका झाली आहे.