जिल्ह्य़ात १४० प्रजातींच्या पक्ष्यांचे अस्तित्व

पक्षी सप्ताहातील गणना; संवर्धनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पक्षी सप्ताहातील गणना; संवर्धनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नाशिक : जिल्ह्यात विविध प्रजातींच्या जवळपास ३०० पक्ष्यांचे अस्तित्व असून त्यात पक्षी सप्ताहात सलीम अली बर्ड काऊंटच्या माध्यमातून हरसूल वनक्षेत्र, बोरगड, नांदूरमधमेश्वर, गंगापूर धरण, वाघाड धरण, देवळाली आदी परिसरांत स्थानिक नागरिकांच्या सहभागाने करण्यात आलेल्या गणनेत १४० पक्षी आढळल्याची माहिती वन विभागाने दिली.

पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती आणि राज्यातील वन्यजीवविषयक साहित्यिक तथा निवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन यांचे औचित्य साधून नाशिक पश्चिम विभागात पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आल्याचे पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले. सप्ताहात पक्षीगणना, चित्रकला स्पर्धा, ग्रामीण-आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ऑनलाइन माहिती देणे, पक्ष्यांना जखमी करून नुकसान पोहोचविणाऱ्या वस्तूंचा वापर टाळणे, पक्षिप्रेमी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पक्षी संरक्षण, संवर्धन आणि जनजागृतीवर कार्यक्रम पार पडले. ग्रामीण, आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, अधिवास, स्थलांतर, संरक्षण आणि संवर्धन आदी बाबी समजाव्यात यासाठी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि हरसूल वन परिक्षेत्रातील बोरीपाडा येथील गिधाड उपाहारगृह आदी ठिकाणांची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २० हजार विद्यार्थ्यांना दृक्-श्राव्य माध्यमातून दाखविण्यात आली. पक्ष्यांना जखमी करण्यास कारक ठरणारे पतंगाचा मांजा, नॉयलान आणि प्लास्टिकचा वापर टाळणे, दीपावलीत फटाक्यांच्या प्रदूषणामुळे पक्ष्यांना होणारा त्रास यावर माहिती देण्यात आली.

हे वाचले का?  नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

हरसूल वनक्षेत्र, बोरगड, नांदूरमधमेश्वर, गंगापूर धरण, वाघाड धरण, देवळाली आदी भागांत स्थानिक नागरिकांच्या सहभागाने १४० पक्ष्यांची गणना करण्यात आली. पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त किंवा धोकाग्रस्त पक्षी आणि त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, पक्षी संरक्षण, संवर्धन आदी कायद्यांविषयी नेचर कंझव्‍‌र्हेशन सोसायटी, इको-एको फाऊंडेशन, आपलं पर्यावरण आदी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नागरिकांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यात आल्याचे गर्ग यांनी सांगितले.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

पक्षी सप्ताहात इयत्ता आठवीपर्यंत आणि खुला या गटात घेण्यात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता आठवीपर्यंतच्या गटातील विद्यार्थ्यांना ‘माझ्या सभोवतालचा पक्षी’ हा विषय देण्यात आला होता. यात पहिले पारितोषिक नंदिनी विश्वकर्मा, दुसरे पारितोषिक राधिका जय्यतमहल, तृतीय पारितोषिक विहंग माळी, तर उत्तेजनार्थ श्रुती पगारे आणि वैष्णवी येवले यांनी मिळविले. खुल्या गटासाठी ‘दिवसेंदिवस घटणारी पक्षी संख्या’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये खुशाल सोनवणे, सागर विश्वकर्मा, डॉ. मोनाली हर्षे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, तर उत्तेजनार्थसाठी तृनाल सोनवणे आणि स्नेहा गरुड यांच्या चित्राची निवड झाली.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव