जिल्ह्य़ात ५६५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

जिल्ह्यतील ५६५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होत असून त्याची संपूर्ण तयारी पूर्णत्वास गेली आहे.

मतदारांसाठी मुखपट्टी बंधनकारक; केंद्रावर तापमापनही होणार

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यतील ५६५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होत असून त्याची संपूर्ण तयारी पूर्णत्वास गेली आहे. जिल्ह्यत एकूण ६२१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहे. त्यातील ५५ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली. काही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द झाली. त्यामुळे चार हजार २२९ जागांसाठी हे मतदान होत आहे. करोनाकाळात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने नियमांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुखपट्टी परिधान केली असेल तरच मतदाराला मतदानास परवानगी असेल. शिवाय, केंद्रात प्रवेश करताना संबंधितांच्या शरीरातील तापमापन होणार आहे.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

गुरुवारी सकाळपासून तालुकानिहाय मतदान साहित्य तहसील कार्यालयात वितरित करण्यात आले. ४०२ जीप, ६१ एसटी आणि लहान आकाराच्या १२३ बसमधून  नियुक्त अधिकारी, कर्मचारी हे साहित्य घेऊन दुपारी मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान प्रक्रियेसाठी ३८९ निवडणूक निर्णय अधिकारी, तर नऊ हजार ७६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

६२१ ग्रामपंचायतींमध्ये पाच हजार ८९५ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. त्यातील १६३७ जागा बिनविरोध निवडून आल्या. देवळा तालुक्यातील उमराळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच, सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याचे पुरावे मिळाल्याने निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली. उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींत चार हजार २२९ जागांसाठी ११ हजार ५६ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रत्येकी २५६० मतपत्रिका आणि नियंत्रक अर्थात ‘कंट्रोल’ संच वापरले जाणार आहेत. जिल्ह्यत ४४ ग्रामपंचायती संवेदनशील असून आठ ग्रामपंचायती अतिसंवेदनशील आहेत. या निवडणुकीसाठी १२ लाख ८४ हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिली.  ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. करोनाच्या नियमांचा प्रचारात उमेदवारांना विसर पडला होता. मतदान प्रक्रियेत मात्र करोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मुखपट्टय़ांचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत असतील. मुखपट्टी असल्यास मतदाराला केंद्रात प्रवेश मिळेल. मुखपट्टीविना आलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही असे गावंडे यांनी सांगितले.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ

५६५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १९५२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एरवी निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर हजार ते १२०० मतदार असतील असा विचार केला जातो. करोनाकाळात मतदानावेळी एकाच केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून साधारणत: ८०० मतदारांसाठी एक यानुसार मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले. सुरक्षित अंतराचे पथ्य पाळून मुखपट्टी परिधान केलेल्या मतदारांना मतदान करता येईल. आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामार्फत केंद्रावर मतदाराचे तापमानही तपासता येईल.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश