जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा

१५ ते २० डिसेंबरपर्यंत गडामधील नवरात्र महालामध्ये बसवण्यात आले होते खंडोबाचे घट

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामध्ये रविवारी सनई-चौघड्याच्या निनादात चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात आला. १५ ते २० डिसेंबर पर्यंत गडामधील नवरात्र महालामध्ये खंडोबाचे घट बसवण्यात आले होते. या सहा दिवसाच्या काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने ऎतिहासिक गड उजळला होता तर मुख्य मंदिर व देवाचा गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता. आज पहाटे स्थानिक मानकरी-ग्रामस्थांच्या पूजा व अभिषेक झाले. त्यानंतर देवाचे घट उठवण्यात आले.हजारो भाविकांनी आज गडावर देवाचे दर्शन घेतले.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

शनिवारी रात्री जेजुरी गावातून प्रथेप्रमाणे तेल हंड्याची मिरवणूक काढण्यात आली. या हंड्यात ग्रामस्थांनी तेल ओतले. सनई-ढोल वाजवीत हा तेल हंडा खंडोबा गडावर नेण्यात आला. रात्री देवाला या तेलाचे तेलवण करुन हळद लावण्यात आली. पौष पोर्णिमेला खंडोबा-म्हाळसादेवीचा विवाह पाली (जि.सातारा) येथे केला जातो. या लग्नाची हळद जेजुरी गडावर खंडोबाला लावली जाते. या निमित्त गडावर फराळाचा रुखवतही मांडण्यात आला होता.चंपाषष्ठी निमित्त भाविकांनी खंडोबाला श्रद्धापूर्वक वांग्याचे भरीत, रोडगा, पुरणपोळी, कांद्याची पात आदी नैवेद्य अर्पण केले. साऱ्या महाराष्ट्रात आज घराघरात बसविलेले खंडोबाचे घट उठवण्यात आले. तळी-आरती करुन देवाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवण्यात आला.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

चंपाषष्ठी पासून चातुर्मास पाळणारे भाविक कांदा, वांगी, लसूण खाणे सुरुवात करतात. त्यामुळे चंपाषष्ठी उत्सवाला खूप महत्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडावर भाविकांना तोंडाला मास्क लावणे, गर्दी न करणे अशा सूचना वारंवार खंडोबा देवस्थानच्या वतीने दिल्या जात होत्या. परंतु अनेक भाविक याकडे दुर्लक्ष करीत होते. मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी खंडोबाने मार्तंड भैरव अवतार धारण करून या दैत्यांचा वध केला. म्हणून या उत्सवास देवदिवाळी असे म्हणतात. जेजुरीत गर्दी झाली होती. भंडार-खोबरे मोठ्या प्रमाणात खरेदी करुन खंडोबाला अर्पण केले. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्यावतीने दररोज भाविकांना भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले