जेतेपदात गोलंदाजांचे योगदान!

रोहितचे कौतुकोद्गार

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर  कर्णधार रोहित शर्माने संघातील प्रत्येक गोलंदाजाचे कौतुक केले आहे.

‘‘आम्हाला पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉइनिसला बाद करण्यात यश आले. त्यापाठोपाठही अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या दोन महत्त्वपूर्ण फलंदाजांना आम्हाला बाद करता आले. सुरुवातीपासून दिल्लीच्या फलंदाजांवर अंकु श ठेवण्याच्या रणनीतीची गोलंदाजांनी यशस्वी अंमलबजावणी के ली. स्टॉइनिस आणि धवन या दिल्लीच्या अव्वल फलंदाजांना लवकर बाद करणे महत्त्वाचे होते. ट्रेंट बोल्टसारखा नवीन चेंडू हाताळणारा दर्जेदार गोलंदाज नेहमीच उपयोगी पडतो,’’ असे रोहितने म्हटले.

‘‘बोल्टप्रमाणेच जसप्रीत बुमरा, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाइल, राहुल चहर, कृणाल पंडय़ा या सर्वच गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. कुल्टर-नाइलने मोक्याच्या क्षणी ऋषभ पंतला बाद केले. त्यामुळे दिल्लीच्या मोठी धावसंख्या करण्याच्या आशा संपुष्टात आल्या,’’ असे अंतिम फेरीत ५१ चेंडूंत ६८ धावांचे योगदान देणाऱ्या रोहितने सांगितले.

फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला सामोरे जाण्याविषयी रोहित म्हणाला की, ‘‘अश्विनविरुद्ध खेळण्याचे वेगळे नियोजन केले नव्हते. मात्र अश्विन हा महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीपासून जर चांगले खेळलो तर त्याच्यावर दडपण ठेवण्यात यश येते. लक्ष्याचा पाठलाग करायचा असतो तेव्हा कितीही धावांचे आव्हान असले तरी चांगली सुरुवात करावी लागते. चांगली सुरुवात आम्हाला करता आली,’’ असे रोहितने सांगितले.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

करोना साथीच्या काळात ‘आयपीएल’चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल  रोहितने आयोजकांचेही आभार मानले. ‘‘खेळाडूंच्या सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेण्यात आल्याने आम्हाला कोणत्याही दडपणाशिवाय मैदानात चांगली कामगिरी करता आली. खेळाडूंसाठी प्रत्येक संघाने जैवसुरक्षित वातावरणाची उत्तम प्रकारे निर्मिती केली होती. आम्ही जिंकल्याने भारतात असलेल्या मुंबईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल यात शंका नाही,’’ असे रोहितने सांगितले.

सूर्यकुमार धावचीत झाल्याने रोहितला खेद

‘‘सूर्यकुमार धावचीत व्हायला मी जबाबदार होतो. सूर्यकुमारऐवजी मीच तंबूमध्ये जायला हवे होते. सूर्यकुमार सध्या चांगलाच बहरात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने सर्वोत्तम फलंदाजी केली आहे. आयपीएलमध्ये पहिल्या लढतीपासून सूर्यकुमार चांगली फलंदाजी करत आहे,’’ असे रोहितने म्हटले.

रोहित मुंबईत दाखल : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुबईतूनच रवाना झाला. मात्र मुंबई इंडियन्सला ‘आयपीएल’चे पाचवे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा अन्य सहकाऱ्यांसह मुंबईत परतला असून लवकरच तो पुनर्वसन कार्यक्रमासाठी तो दिवाळीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे. कोहलीने अखेरच्या तीन कसोटी सामन्यांतून माघार घेतल्याने रोहितची तंदुरुस्ती भारतीय संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना १७ ते २१ डिसेंबरदरम्यान अ‍ॅडलेड ओव्हल येथे प्रकाशझोतात खेळवण्यात येईल.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

थकव्यामुळेच पराभूत – श्रेयस

अंतिम फेरीतील गोलंदाजांच्या अपयशाला थकवा हीच बाब कारणीभूत ठरली, असे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवानंतर म्हटले.

‘‘पॉवर-प्लेमध्ये आमच्या गोलंदाजांकडून चांगली कामगिरी झाली नाही. कदाचित थकवा हे त्यांच्या अपयशाचे कारण असू शकते. मात्र प्रथम फलंदाजी घेण्याचा आमचा निर्णय योग्य होता. आमचे अव्वल फलंदाज बहरात होते. या स्थितीत मोठी धावसंख्या उभारून मुंबईवर दडपण आणण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र सुरुवातीलाच आमचे तीन मोलाचे फलंदाज बाद झाले आणि मोठी धावसंख्या उभारण्याचे नियोजन फिस्कटले,’’ असे श्रेयसने म्हटले.

‘‘१५व्या षटकापर्यंत आमची धावसंख्या समाधानकारक होती. मात्र अखेरच्या पाच षटकांत मोठे फटके खेळता आले नाहीत. त्यातच मोठी धावसंख्या नसल्याने गोलंदाजांनाही सामना वाचवण्याची फारशी संधी नव्हती. मात्र स्पर्धेत आमच्या गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली. कॅगिसो रबाडाने सर्वाधिक ३० बळी घेत अन्य गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावला. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने सर्वोत्तम कामगिरी बजावली,’’ असे श्रेयसने सांगितले.

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

दिल्लीच्या एकूण कामगिरीवर समाधान व्यक्त करताना श्रेयस म्हणाला की, ‘‘या स्पर्धेत अनेक सकारात्मक निकाल नोंदवता आले. पुढील वर्षी याहून चांगली कामगिरी करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. अनेक लढतींमध्ये सुरुवातीला आम्ही फलंदाज गमावले. त्या चुकांवर मेहनत घेण्याची गरज आहे. पॉवरप्लेमध्ये आमच्या गोलंदाजांकडून बऱ्याच धावा दिल्या गेल्या. त्या चुका सुधारण्याची गरज आहे,’’ असे श्रेयसने सांगितले.