“जेव्हा मी मुलाखत देईन तेव्हा राज्यात नाही, तर देशात भूकंप होईल”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सामनातील मुलाखतीतील टीकेवरून सूचक इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सामनातील मुलाखतीतील टीकेवरून सूचक इशारा दिला आहे. “सध्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे, पण ज्या दिवशी मी बोलेन त्या दिवशी या राज्यात नाही, तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला. यावेळी कुणी कुणाशी विश्वासघात केल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदेंनी ठाकरेंवर प्रश्नांच्या अनेक तोफा डागल्या. ते शनिवारी (३० जुलै) नाशिकमधील मालेगाव येथे सभेत बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “सध्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे. मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. परंतु, जेव्हा माझी मुलाखत होईन आणि योग्य वेळी बोलेन, त्या दिवशी या राज्यात नाही, तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही.”

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

“तुम्ही आमचे आईबाप काढता, आम्ही कधी आई-बापांना भेटलो?”

“आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली आहे. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. वयाच्या १६ व्या वर्षापासून आम्ही शिवसेना वाढीसाठी मेहनत करतो आहे. तुम्ही आमचे आईबाप काढता. आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो, कधी आमच्या मुलाबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही वर्षातून दोन दोन, तीन तीन वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके शिवसेना करत राहिलो,” असं शिंदे यांनी सांगितलं.

“शिवसेना अशीच मोठी झाली आहे का?”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “आम्ही कधी वेळ-काळ बघितला नाही, दिवस-रात्र बघितली नाही. शिवसेना अशीच मोठी झाली आहे का? बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांमधून शिवसेना मोठी झाली. वेगवेगळ्या विभागात दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यासारख्या आमच्या नेत्यांच्या मेहनतीमुळे शिवसेना मोठी झाली. आरोप-प्रत्यारोप करणं माझा स्वभाव नाही. परंतु आम्ही गद्दारी केली, विश्वासघात केला, असे आरोप झाले.”

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

“काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का?”

“भाजपा-शिवसेना युतीने निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला कौल दिला. त्या लोकांसोबत सत्तास्थापन करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग गद्दारी आम्ही केली का? विश्वासघात आम्ही केला का? हा विचार करण्याची आवश्यकता आहे,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

“बाळासाहेबांच्या भूमिकेशी विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला”

एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला थारा दिला नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी जवळ केलं. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केलं, मग विश्वासघात कुणी केला? तुम्ही केला की आम्ही? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही त्या बाळासाहेबांच्या भूमिकेशी प्रतारणा, विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.”

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

“आम्हाला सावरकरांविषयी अपमानजनक शब्द काढणाऱ्यांविरुद्ध बोलता येत नव्हतं”

“सावरकरांविषयी अपमानजनक शब्द काढणाऱ्या काँग्रेसच्या लोकांविरुद्ध आम्हाला बोलता येत नव्हतं. तोंडाला पट्टी लावून बसावं लागत होतं. मग विश्वासघात आम्ही केला की आणखी कुणी केला,” असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.