“तर माझं नाव संजय राऊत नाही”
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरमयान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेफाट आरोप केले जात असून त्यातून काही निष्पन्न होणार नाही असं म्हटलं आहे. तर याचवेळी त्यांनी आरोप सिद्ध झाले नाहीत तर जोड्याने मारणार असल्याचं म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
“ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
“राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल वाईट प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही,” असंही संजय राऊत यांनी सुनावलं.
“ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेल, पण मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची आहे. जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? पक्षाने आमचा या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही असं सांगावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगावं,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात कोणतंही राजकारण नाही –
“नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात कोणतंही राजकारण झालेलं नाही. याआधी आमच्याही सुरक्षा काढल्या आहेत. पण म्हणून आम्ही कधी बोंबललो नाही. मागच्या वेळी आम्ही सरकारमध्ये असतानाही सुरक्षा काढून घेतली होती, पण मी एका शब्दाने तक्रार केली नाही. सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते त्यामध्ये महत्वाची लोकं असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा सूडबुद्दीने वागावं असा ट्रेण्ड राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची आहे असं कोणीही म्हणू शकत नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा?
“विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विदर्भातील नाना पटोले तिथे अध्यक्ष आहेत. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद बदललं जात असून जी काही नावं आहेत त्यात नाना पटोलेंचं नाव असल्याचं मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहेत. त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्थता राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचं सरकार हे प्रदीर्घ काळ चालणार आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.