…तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर उभा राहील, संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा

“महाराष्ट्रात व्यापार करणं दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल”

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. सगळी चौकशी झाल्यानंतर १२० नेत्यांची यादी आपण पाठवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

हे वाचले का?  “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा

फडणवीसांनी काही चुकीचं केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “कोणी चौकशीला घाबरत नाही. आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे विसरु नका. तेव्हा चौकशांना कोण घाबरत आहे लवकरच कळेल”.

संजय राऊत यांना यावेळी तुम्हालाही नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा असल्याचं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, मला अनेकांनी विचारलं. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला…नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचं काम सुरु आहे असं मला कळलं आहे. आम्हीदेखील तयार आहोत”.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका