“तिच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला…”, चित्रा वाघ व उर्फी जावेद वादात सुषमा अंधारेंची उडी

उर्फी जावेदवर केलेल्या विधानावरुन सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीबाबत विधान केलं होतं.  “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन” असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सुषमा अंधारेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री केतकी चितळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावत खोचक सवाल केला आहे.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

“मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकंच…

अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?

उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?

आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीस यांना) मारहाणीची भाषा कराल का?

नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल”

चित्रा वाघ यांनी थोबाडीत देईन असं म्हटल्यानंतर उर्फीने त्यांना इन्स्टाग्राम स्टोरीमधून उत्तर दिलं आहे. दिल्लीतील घटनेचा उल्लेख करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपाशी संबंधित असलेल्या आरोपीसाठी आवाज उठवताना बघायला आवडेल, असं उर्फीने म्हटलं आहे.