स्वरा भास्करची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ३९ आमदारांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन केले जात आहे. तर दुसरीकडे या राजकीय उलथापालथीनंतर केदार शिंदे, पराग कान्हेरे, आरोह वेलणकर यांसारखे अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतंच या संपूर्ण घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने भाष्य केलं आहे.
स्वराने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना स्वरा म्हणाली, “तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद!करोना काळात तुम्ही निःपक्षपाती आणि राज्याचे जबाबदार, पारदर्शक, संवाद साधणारे आणि आश्वासन देणारे नेते होतात. तुमच्या वागण्याने माझ्यासारख्या समीक्षकांनी देखील प्रशंसक बनवले. तुम्ही असताना महाराष्ट्र प्रशासनाने जे काम केलं ते तुमच्या वाखाणण्याजोगे आहे.”
दरम्यान महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात शिवसेनेनं बंडखोर १६ आमदारांना निलंबित केल्याची याचिका न्यायप्रविष्ठ असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. या बहुमत चाचणीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देताना उद्याच बहुमत चाचणी होईल असं म्हटलं. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
३१ महिने मुख्यमंत्रीपदी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्ता स्थापन केली. गेल्या महिन्यात महाविकासआघाडी सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. त्यावेळी आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचे आमदार फुटल्याने त्यांना २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.