“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

आप खासदार संजय सिंह म्हणाले, भाजपाला निधी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीतल्या ३३ कंपन्या अशा आहेत ज्यांचं गेल्या सात वर्षांमध्ये १ लाख कोटी रुपयांचं नुकशान झालं आहे, मात्र त्याच कंपन्यांनी भाजपाला ४५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

गेल्या दिड महिन्यांपासून देशभरात निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांबाबतचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केला. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाने सर्व तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. या तपशीलांद्वारे निवडणूक रोख्यांबाबतची बरीचशी माहिती समोर आली आहे. त्यानुसार देशात गेल्या पाच वर्षांमध्ये जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले त्यापैकी जवळपास ५० टक्के निवडणूक रोखे एकट्या भारतीय जनता पार्टीने वटवले आहेत. यामधले बरेचसे रोखे हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वटवण्यात आले आहेत.

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

निवडणूक रोख्यांबाबतच्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या काळात एसबीआयने तब्बल २२ हजार २१७ निवडणूक रोख्यांची विक्री केली. त्यातील सर्वाधिक म्हणजेच ८ हजार ६३३ निवडणूक रोखे (४६.७४%) एकट्या भाजपाने वटवले आहेत. यातून भाजपाला १२,७६९ कोटी रुपये मिळाले आहेत.

भाजपाला मिळालेल्या निवडणूक रोख्यांवरून आतापर्यंत अनेक आरोप झाले आहेत. ज्या कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी), आयकर विभाग (आयट) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) धाडी टाकल्या आहेत. या धाडींनंतर काहीच दिवसांनी या कंपन्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले आहेत आणि हे निवडणूक रोखे नंतर भाजपाने वटवल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. यातच आता आम आदमी पार्टीने नवी माहिती सादर केली आहे.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

आपचे खासदार संजय सिंह यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून सिंह यांनी भाजपावर गंभीर आरोप केले. सिंह म्हणाले, भाजपाला निधी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीतल्या ३३ कंपन्या अशा आहेत ज्यांचं गेल्या सात वर्षांमध्ये १ लाख कोटी रुपयांचं नुकशान झालं आहे, मात्र त्याच कंपन्यांनी भाजपाला ४५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. भाजपाला निधी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत १७ कंपन्या अशा आहेत ज्यांनी एकही रुपयांचा कर दिलेला नाही अथवा त्यांना करात सवलत मिळाली आहे. यापैकी ६ कंपन्या अशा आहेत ज्यांनी भाजपाला ६०० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यामध्ये एक कंपनी अशी आहे ज्या कंपनीने त्यांना जितका नफा झाला आहे त्याच्या तीन पटीने अधिक निधी दिला आहे. किती दिलदार कंपनी आहे पाहा… या यादीत एक कंपनी अशी आहे ज्या कंपनीने त्यांच्या नफ्याच्या तब्बल ९३ पट निधी दिला आहे. तर ३ कंपन्या अशा आहेत ज्यांनी कर भरलेलाच नाही, मात्र भाजपाला २८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार