त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या! देशाची वाटचाल आता संकल्पाकडून सिद्धीकडे: पंतप्रधान

देशावर अनेक दशके राज्य करणाऱ्यांनी करदात्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींची पर्वा केली नाही. त्यांची नीती आणि निष्ठा नेहमीच प्रश्नांच्या फेऱ्यात सापडली.

मुंबई, नवी मुंबई : देशावर अनेक दशके राज्य करणाऱ्यांनी करदात्यांचा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टींची पर्वा केली नाही. त्यांची नीती आणि निष्ठा नेहमीच प्रश्नांच्या फेऱ्यात सापडली. सत्ता मिळवायची, मतांचे राजकारण करायचे, स्वत:च्या तिजोऱ्या भरायच्या आणि परिवाराचे हित साधायचे हेच त्यांचे धोरण होते. आम्ही मात्र देशाचा विकास करत  आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी मुंबई येथे केले.

आमची धोरणे आणि निष्ठा देशाशी बांधील आहेत. आधीच्या सरकारकडून प्रकल्प रखडविले गेले, आम्ही ते सुरू केले आणि पूर्णही केले. त्यामुळे देशाची वाटचाल संकल्पाकडून सिद्धीकडे सुरू असल्याचा दावाही मोदी यांनी केला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’ प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उलवे येथील नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खारकोपर-उरण रेल्वे मार्ग, दिघा गाव रेल्वे स्थानक, बेलापूर-पेंढर नवी मुंबई मेट्रो मार्गिकेसह अन्य प्रकल्पांचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह दरम्यान उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

हे वाचले का?  ‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित

राज्य सरकारच्या महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत लेक लाडकी योजनेचा शुभारंभही या वेळी करण्यात आला. या वेळी बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्ला चढवतानाच देशात उभे राहाणारे विकास प्रकल्प हे नव्या भारताची पायाभरणी करणारे ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.यापूर्वीच्या काळात एखादा प्रकल्प एक तर प्रत्यक्षात येत नसे अथवा अनेक दशके लटकत राहत असे. दहा वर्षांपूर्वी जुन्या सत्ताधाऱ्यांच्या काळात हजारो, लाखो कोटी रुपयांच्या मेगा घोटाळय़ांची चर्चा होत असे. आता मात्र आपण हजारो, लाखो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प पूर्ण केल्याची चर्चा करतो. हाच मोठा फरक आहे, असेही मोदी म्हणाले.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

अटल सेतूचे लोकार्पण होणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला मी आलो होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करत संकल्प केला होता की देशाला बदलायचे, देशाला पुढे न्यायचे. कारण याआधीच्या सरकारने प्रकल्प अडविण्याचेच काम केले. त्यांच्या काळात मोठे प्रकल्प होतील असे वाटत नव्हते. पण २०१४ मध्ये मोदी गॅरंटी आली. जेथे सगळय़ांच्या आशा संपतात तिथे मोदी गॅरंटी सुरू होते, असा दावा पंतप्रधानांनी केला.

देशात ज्या प्रकारे आम्ही विकासाचे इमले रचत आहोत तसेच काम राज्यात डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून केले जात आहे, असे सांगत पंतप्रधानांनी महायुती सरकराचे कौतुक केले. मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाचे ३३ हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदा डबल इंजिन सरकार बनले तेव्हा हे प्रकल्प सुरू झाले याचा आवर्जून उल्लेख त्यांनी या वेळी केला.

सागरी सेतूवरून प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे लोकार्पण केल्यानंतर त्यावरून त्यांनी प्रवास केला आणि नवी मुंबईतील चिर्ले येथे पोहोचले. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेतले होते. पंतप्रधानांनी रोड शो करीत विशेष रथातून थेट मंडपात प्रवेश केला. सागरी सेतूने चिर्लेला आल्यानंतर पंतप्रधान फुलांनी सजवलेल्या एका रथातून कार्यक्रमस्थळी पोहोचले. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या स्वागतासाठी ढोल, ताशे तसेच आगरी-कोळी समाजातील पारंपरिक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.