योगेश्वर कांदळकर यांनी हेलिकॉप्टरद्वारे राबविलेली आजवरची ही सर्वात धाडसी बचाव मोहीम ठरली.
हवेत हेलिकॉप्टर एकाच जागी स्थिर ठेवणे (व्होवर) सर्वात धोकादायक मानले जाते. या स्थितीत आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास वैमानिक आणि हेलिकॉप्टरचा बचाव शक्य नसतो. वेगात भ्रमंती करताना बचावासाठी अनेक पर्याय असतात. पण स्थिर अवस्थेत काहीच नसते. त्यामुळे वैमानिकदेखील सहसा अपवादात्मक काळात ही स्थिती धारण करतो. झारखंडमधील त्रिकूट रुजूमार्ग (रोप वे) दुर्घटनेत दुर्गम डोंगर-दऱ्यात १० डब्यांमध्ये अडकलेल्या ३५ यात्रेकरुंच्या सुखरुप सुटकेसाठी मात्र हेलिकॉप्टर प्रत्येक टप्प्यात २० ते ३० मिनिटे स्थिर ठेवले गेले. त्रिकूट दुर्घटनेत बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन आणि नाशिकचे भूमीपूत्र योगेश्वर कृष्णराव कांदळकर यांच्या नेतृत्वाखालील एमआय १७ पथकाने ही जोखीम पत्करली. जीव धोक्यात घालून यात्रेकरुंचे प्राण वाचविले. त्यांच्या या कामगिरीचा शौर्य चक्राने सन्मान झाला आहे. १० एप्रिल २०२२ रोजी झारखंडच्या देवघर जिल्ह्यात त्रिकूट रुज मार्गिकेवर दुर्घटना घडली होती. ही देशातील सर्वात उंचावरील रुजू मार्गिकांपैकी एक मानली जाते. ४५ अंशाच्या कोनात ती तीन हजार फूट उंच टेकडीवर जाते. दुर्घटनेत या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी १० डब्यांत ३५ यात्रेकरू अडकले होते. या बचाव मोहिमेची जबाबदारी ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांच्यावर सोपविली गेली. लटकलेल्या डब्यातून पर्यटकांना सुखरुप बाहेर काढणे अतिशय आव्हानात्मक काम होते. त्यासाठी पाच गरुड कमांडोंना सोबत घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पथकासह दुर्घटना स्थळाकडे झेपावले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), लष्कर, भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वयाने मोहिमेची आखणी केली.
दुर्घटनाग्रस्त भागात हेलिकॉप्टरला तारांचा धोका होता. लटकत्या डब्यात अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रथम गरूड कमांडोंना दोरखंडाने उतरवले गेले. प्रत्येक डब्यातून कमांडोंनी एका पाठोपाठ एक यात्रेकरुंना बाहेर काढून वर थांबलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पाठवले. एकेकासाठी २० ते ३० मिनिटे लागत होती. हे अतिशय आव्हानात्मक काम होते. दुर्गम भागात हेलिकॉप्टरच्या दोरखंडाशिवाय बचावास कुठलाही आधार नव्हता. एका डब्यानंतर दुसरा डबा अशी ही मोहीम अविरतपणे राबविली गेली. पथकातील एमआय १७ हेलिकॉप्टर तितकाच वेळ एकाच ठिकाणी स्थिर अवस्थेत राहिले. सुटका झालेल्या यात्रेकरुंची संख्याच अवघड भौगोलिक स्थिती व जोरदार वाऱ्यात वैमानिकांनी कित्येक तास आपले प्राण धोक्यात टाकल्याची प्रचिती देते. अशा मोहिमेत पराकोटीची एकाग्रता आवश्यक असते.
कांदळकर यांनी असामान्य शौर्य गाजवत कुशलतेने स्थिती हाताळली. जवळपास २६ हून अधिक तास उड्डाणासाठी हवाई दलाने दोन एमआयव्ही पाच -१७, एक एमआय -१७, एक प्रगत हलक्या वजनाचे एएलएच आणि एक चिता अशा पाच हेलिकॉप्टरचा वापर केला. हेलिकॉप्टरद्वारे राबविलेली आजवरची ही सर्वात धाडसी बचाव मोहीम ठरली. तिचे नेतृत्व करणारे कांदळकर हे मूळचे नाशिकचे. ओझर टाऊनशीप येथील जीईएच एचएएल हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून ते हवाई दलात दाखल झाले. सध्या ते जम्मू-काश्मीरमध्ये प्रमुख कार्यवाही अधिकारी म्हणून तैनात आहेत. त्यांच्या अद्वितीय कामगिरीने नाशिकचे नांव देशात अधोरेखीत झाले.