त्र्यंबकेश्वरसाठी महाशिवरात्रीनिमित्त आजपासून जादा बससेवा

भगूर ते टाकेद मार्गावर सिन्नर, नाशिकहून सात मार्च रोजी १०, आठ मार्च रोजी २० आणि नऊ मार्च रोजी २० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

नाशिक – बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिक, भगूर, सिन्नर येथून त्र्यंबकेश्वरसाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. सात ते नऊ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्थानकांमधून भाविकांच्या मागणीनुसार जादा बस सोडण्यात येणार आहेत.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

महाशिवरात्रीला दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथे देशभरातील भाविकांची गर्दी होत असते. याशिवाय जिल्ह्यातील सर्वतीर्थ टाकेद, सोमेश्वर, दोधेश्वर, कपालेश्वर, सिध्देश्वर पारेगाव, शिरसमणी, नागापूर, कावनई या ठिकाणी महाशिवरात्रीला जत्रा भरत असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून नियोजन करण्यात आले आहे.

भगूर ते टाकेद मार्गावर सिन्नर, नाशिकहून सात मार्च रोजी १०, आठ मार्च रोजी २० आणि नऊ मार्च रोजी २० जादा बस सोडण्यात येणार आहेत. घोटीहून टाकेद, कावनई तसेच इगतपुरीहून कावनई या मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी जादा बस पाठवण्यात येणार आहेत. सात मार्च रोजी इगतपुरीहून पाच, आठ मार्च रोजी इगतपुरी, पेठ, लासलगांव, पिंपळगावहून २२ जादा बस सोडण्यात येणार आहेत. नऊ मार्च रोजी इगतपुरीहून १५ जादा बस सोडण्यात येणार आहेत. ठक्कर बाजार नवीन बस स्थानकासह त्र्यंबकेश्वरसाठी वेगवेगळ्या आगारातून सात रोजी १८, आठ रोजी ४५ आणि नऊ रोजी २३ जादा बस सोडण्यात येणार असून प्रवाश्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करुन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.