जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार देवस्थानने श्रावण महिन्यात शासन, जिल्हा प्रशासनाकडून पत्रव्यवहार होणाऱ्या राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व विशेष (व्हीआयपी) दर्शन१० सप्टेंबरपर्यंत बंद केले आहे.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थानच्यावतीने एक ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची विशेष (व्हीआयपी) दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावणात भाविकांची संख्या नेहमीपेक्षा कित्येक पटीने वाढते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. या काळात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार असून श्रावणातील सोमवारी पहाटे चार वाजता म्हणजे एक तास अगोदर मंदिर खुले केले जाणार आहे. दर्शनासाठी ताटकळणारे भाविक आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांमध्ये काही वेळा वाद होतात. सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार देवस्थानने श्रावण महिन्यात शासन, जिल्हा प्रशासनाकडून पत्रव्यवहार होणाऱ्या राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व विशेष (व्हीआयपी) दर्शन१० सप्टेंबरपर्यंत बंद केले आहे.
या काळात व अन्य वेळीही अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या संख्येत मर्यादा घालून त्यांची दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी सात ते १० आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेत प्रतिदिन २० अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाची व्यवस्था केली जाईल. या व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे विशेष दर्शन या काळात बंद करण्यात आल्याचे देवस्थानने म्हटले आहे. धर्मदर्शन आणि देणगी दर्शन नोंदणी ऑनलाईन करण्याची व्यवस्था लवकरच कार्यान्वित केली जात आहे.
दर्शन रांगेचे नियोजन
पूर्व दरवाजा दर्शन बारीतून भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. या ठिकाणी साधारणत: सहा ते सात हजार भाविक असतील, या गृहितकाने दर्शन रांगेचे नियोजन, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इ शौचालयाचे नियोजन केले जाणार आहे. मंदिराच्या उत्तर महाद्वारातील गर्दी कमी करण्यासाठी देणगी दर्शन घेणाऱ्या भाविकांना पूर्व दरवाजाच्या दर्शनबारीच्या उत्तर बाजूस असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल.
स्थानिक ग्रामस्थांना पहाटे मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. गर्दीमुळे मंदिर परिसरातून भाविकांना बाहेर निघण्यासाठी दक्षिण दरवाजा (गायत्री मंदिर गेट) निश्चित करण्यात आले. भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असणार आहे. दर्शन रांगेत उभे न राहणाऱ्या भाविकांसाठी उत्तर महाद्वार प्रवेशद्वारासमोर, तीर्थराज कुशावर्त व जव्हार फाटा येथे एलईडी पडद्यांवर थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आल्याचे देवस्थानने म्हटले आहे.
नगरपरिषदेतर्फे तयारी
श्रावण महिन्यात गर्दीचे नियोजन करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये विविध ठिकाणी लोखंडी अडथळे उभारले जातात. गणपतबारी, बिल्वतीर्थ, नवीन बसस्थानक या ठिकाणी त्र्यंंबकेश्वर नगर परिषदेकडून तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था केली जाणार आहे. मंदिर परिसरासह शहरातील अन्य भागात स्वच्छता ठेवण्याचे काम अहोरात्र केले जाईल. श्रावणातील गर्दी लक्षात घेऊन संत गजानन महाराज चौक ते कुशावर्त तीर्थ दरम्यानचे अतिक्रमण काढले जात आहे. शहरातील आणि फेरी मार्गावरील संपूर्ण विद्युत व्यवस्था नगर परिषदेकडून केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी श्रेया देवचक्के यांनी सांगितले. या” काळात भाविकांना आरोग्य, शौचालय, स्वच्छता, वाहनतळ, पिण्याचे पाणी आदी सोयी सुविधा पुरविणे गरजेचे असते. श्रावण सुरू होण्याआधीच शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे कामही करण्यात आल्याचे देवचक्के यांनी सांगितले.