थंडीची चाहूल लागताच राज्यात विजेची मागणी घसरली; कोराडी प्रकल्पात सर्वाधिक वीज निर्मिती

राज्यात सुमारे आठ दिवसांपूर्वी विजेची मागणी २८ हजार मेगावाॅटहून जास्त नोंदवली गेली होती. परंतु थंडीची चाहूल लागताच आता ही मागणी सुमारे एक हजार मेगावाॅटने कमी होऊन २७ हजार मेगावाॅटवर आली आहे.

नागपूर : राज्यात सुमारे आठ दिवसांपूर्वी विजेची मागणी २८ हजार मेगावाॅटहून जास्त नोंदवली गेली होती. परंतु थंडीची चाहूल लागताच आता ही मागणी सुमारे एक हजार मेगावाॅटने कमी होऊन २७ हजार मेगावाॅटवर आली आहे. एकूण मागणीपैकी ३ हजार ३८५ मेगावाॅट विजेची मागणी मुंबईतील होती.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

राज्यात शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी २.५० ला विजेची मागणी २७ हजार ३५ मेगावाॅट होती. त्यापैकी राज्यात १४ हजार ५१९ मेगावाॅट निर्मिती होत होती. एकूण निर्मितीपैकी ६ हजार ५२२ मेगावाॅटची निर्मिती महानिर्मितीच्या विविध औष्णिक विद्युत प्रकल्पातून होत होती. कोराडी प्रकल्पातून सर्वाधिक १ हजार ८९४ मेगावाॅट निर्मिती झाली. उरन गॅस प्रकल्पातून १३५ मेगावाॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ४७ मेगावाॅट, सौरऊर्जा प्रकल्पातून ६० मेगावाॅट वीज निर्मिती झाली. खासगीपैकी अदानी प्रकल्पातून १ हजार ८२८ मेगावाॅट, जिंदलमधून १ हजार ९५ मेगावाॅट, रतन इंडियामधून १ हजार ७४ मेगावाॅट, आयडियल २४५ मेगावाॅट, एसडब्लूपीजीएलमधून २३२ मेगावाॅट वीज निर्मिती झाली.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

केंद्राच्या वाट्यातून राज्याला १२ हजार ३८१ मेगावाॅट वीज मिळत होती. सुमारे आठ दिवसांपूर्वी राज्यात विजेची मागणी २८ हजार मेगावाॅटहून जास्त होती. परंतु राज्याच्या बऱ्याच भागात तापमान कमी झाल्यामुळे विजेची मागणी कमी होत आहे. विजेची मागणी कमी झाल्याच्या वृत्ताला महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दुजोरा दिला.