थोरात-विखे तिसऱ्या पिढीतील संघर्षाची झाली नांदी..; डॉ सुजय विखे व डॉ. जयश्री थोरात आमने सामने

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे या मोठ्या नेत्यांत कितीही वाद झाले तरी पुढच्या पिढीतील डॉ. जयश्री थोरात आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अद्याप पर्यंत एकमेकांवर कधीही टीका टिप्पणी केली नव्हती.

संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे या मोठ्या नेत्यांत कितीही वाद झाले तरी पुढच्या पिढीतील डॉ. जयश्री थोरात आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अद्याप पर्यंत एकमेकांवर कधीही टीका टिप्पणी केली नव्हती. मात्र आता या दोघांनीही एकमेकांवर शेलक्या शब्दात जोरदार हल्ले प्रतिहल्ले केल्याने थोरात विखे परिवारात तिसऱ्या पिढीतील संघर्षाची नांदी आता सुरू झाली आहे.

नगर जिल्ह्यातल्या राजकिय घराण्यातला संघर्ष गेली अनेक वर्ष राज्यात गाजतो आहे. ७०-८० च्या दशकात कोपरगावच्या काळे – कोल्हे संघर्ष असाच राज्यभर चर्चिला गेला होता. गेल्या काही वर्षांपासून थोरात – विखे संघर्ष राज्यभर गाजतो आहे. आता हा संघर्ष तिसऱ्या पिढीत हस्तांतरित झाला आहे. प्रारंभी प्रदीर्घकाळ खासदार राहिलेले बाळासाहेब विखे आणि सहकारातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांच्यात जोरदार खटके उडत असत. ही संघर्षाची परंपरा दुसऱ्या पिढीत मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात अधिक तीव्रपणे पुढे चालू राहिली. तिसऱ्या पिढीतील डॉ. सुजय विखे व डॉ. जयश्री थोरात हे आता आतापर्यंत या संघर्षापासून दूर होते. त्यांनी कधीही एकमेकांना लक्ष केले नव्हते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांतील वादालाही तोंड फुटल्याने आता हा संघर्ष तिसऱ्या पिढीत पोहोचल्याचे मानण्यात येते.

हे वाचले का?  माजी आमदार राजन तेली यांचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

संगमनेर तालुक्यातल्या तळेगाव येथे झालेल्या सभेत डॉ. विखे यांनी आमदार थोरात यांना टीकेचे लक्ष करताना ‘ मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडणाऱ्यांना आता आमदारही होता येणार नाही ‘ असा जहरी शब्दात मारा केला. स्वतः थोरात मुंबईत असल्याने या टीकेला त्यांना उत्तर देण्याची संधी मिळाली नाही, परंतु ही उणीव त्यांची कन्या डॉ. जयश्री यांनी भरून काढली. शिर्डी मतदारसंघात गेलेल्या परंतु स्वतःच्या जोर्वे या जन्मगावी झालेल्या सभेत प्रथमच आक्रमक भाषण करताना ‘ माझ्या बापाला त्रास द्याल तर खबरदार…!’ असा सज्जड दम भरत डॉ. जयश्री यांनी तुमच्या मतदारसंघात गेलेली आमची २८ गावे यावेळी तुमचा समाचार घेतील असेही बजावले. आमदार थोरात यांच्यामुळेच तालुक्याचा विकास झाला. ‘ हा बाप माझ्या एकटीचा नसून, तालुक्यातल्या सात लाख जनतेचा बाप आहे,’ या शब्दात त्यांनी डॉ. विखे यांना आव्हान दिले.

हे वाचले का?  Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका तासात चार मोठे पक्षप्रवेश अन् उमेदवाऱ्याही जाहीर; ‘मविआ’तील तिन्ही पक्षांना अप्रत्यक्ष इशारा?

त्यानंतर तालुक्यातल्या साकुर गावात झालेल्या सभेत डॉ. विखे यांनी खरपूस शब्दात त्यांचा समाचार घेतला. ‘ संगमनेरची राजकन्या ‘ असे शेलके विशेषण लावत डॉ. विखे म्हणाले, आम्ही तुमच्या वडिलांवर नाही तर इथल्या आमदारांवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर, आणि निष्क्रियतेवर बोलतो. चाळीस वर्ष विखे परिवार राजकारणात आहे, परंतु आम्ही कायम जनतेला ‘ मायबाप ‘ मानत आलो. खरी बाप जनता असते, हे येत्या निवडणुकीत इथले मतदार दाखवून देतील. त्यासाठी ‘टायगर अभी जिंदा है’ असेही त्यांनी बजावले.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा