दर बुधवारी सौंदाणे,वडनेरसह पाच आरोग्य केंद्रांवर करोना लसीकरण

मालेगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय दाभाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर-खाकुर्डी या दोन केंद्रांवर एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : मालेगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय दाभाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर-खाकुर्डी या दोन केंद्रांवर एक मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दर आठवडय़ात बुधवारी  सौंदाणे, निमगाव, कळवाडी, चिखल ओहोळ आणि वडनेर येथील प्राथमिक आरोग्य के ंद्रांवर करोना लसीकरण करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी कळविले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ३१ डिसेंबर २०२० रोजी  वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाला सुरूवात झाली असून लसीकरणासाठी केंद्रावर येतांना स्वत:चे आधार कार्ड आणि जन्मतारखेचा पुरावा सोबत आणावा, असे आवाहनही डॉ. निकम यांनी केले आहे.

ज्या नागरिकांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक आणि ज्यांना दिर्घकालीन आजार आहेत अशा नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत असून त्यांनी स्वत:चे आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा आणि दीर्घकालीन आजार असलेल्या वैद्यकीय दाखल्यासह लसीकरणासाठी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सुचना डॉ.निकम यांनी दिल्या आहेत.

करोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह दीर्घकालीन आजार असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही डॉ.निकम यांनी केले आहे.