दहावीचा आज निकाल

आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत  २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली  असे एकूण १६ लाख ५८  हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते.   लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र  करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली.

हे वाचले का?  सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित

येथे उपलब्ध…

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. तसेच मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in  आणि mahahssc board.in या संकेतस्थळावर शाळाना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.