यापूर्वी १५ मार्च रोजी २४,४९२ रुग्णांची नोंद झाली होती
भारतात करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. पाच महिन्यांनंतर, सर्वात कमी करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन करोनबाधितांची नोंद झाली आहे. तर ४३७ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी १५ मार्च रोजी २४,४९२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,८३० लोक करोनामुक्त झाले आहेत.
करोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी २२ लाख ५० हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ३२ हजार ७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ४८ हजार लोकांनी करोनावर मात केली आहे. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी आहे. एकूण ३ लाख ६९ हजार रुग्ण सध्या उपचाराधिन आहेत.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण
देशातील दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केरळमध्ये सोमवारी १२,२९४ नवीन बाधितांची नोंद झाली तर १४२ रुग्णांचा मृत्यू झाला. केरळमध्ये एकूण बाधितांची संख्या ३७ लाख २ हजारांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांची संख्या १८,७४३ झाली आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती
राज्यात दैनंदिन आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांची संख्यी ही बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ८११ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवा, राज्यात आज १०० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.
दरम्यान राज्यात आणखी दहा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या ७६ वर पोहोचली आहे. दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्य़ातून १०० नमुने जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचणीसाठी पाठविले जात आहेत. यातून डेल्टा प्लसबाधित रुग्णांचे निदान केले जाते. राज्यात यापूर्वी ६६ रुग्ण डेल्टा प्लस बाधित आढळले होते. सोमवारी आणखी दहा रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सहा, रत्नागिरीमध्ये तीन, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एक रुग्ण आढळला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ ऑगस्टपर्यंत देशभरात करोना लसीचे ५५ कोटी ४७ लाख ३० हजार डोस देण्यात आले आहेत. सोमवारी ८८.१३ लाख लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) नुसार, आतापर्यंत ४९ कोटी ६६ लाख करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी सुमारे १५.६३ लाख चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.