दिल्लीतील रुग्णालयात करोनाचा विस्फोट; ८० डॉक्टर, कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह

या ठिकाणी २७ वर्ष काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू

दिल्लीतील सरोज रुग्णालयामधील डॉक्टरांसह ८० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे रुग्णांची संख्या पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाधित झाल्यानंतरही येथे रुग्णांवरील उपचार सुरु ठेवण्यात आलेत. या संसर्गाच्या लाटेमध्ये मागील २७ वर्षांपासून या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरचा करोना संसर्गामुळे मृत्यू झालाय. करोनाची बाधा झालेल्या १२ डॉक्टर, कर्मचाऱ्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. इतर कर्मचारी आणि डॉक्टरांना होम क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे.

रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पी. के. भारद्वाज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर ए. के. रावत यांचं शनिवारी निधन झाल्याची माहिती दिली. रावत यांना करोनाचा संसर्ग झाला होता, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असं भारद्वाज म्हणाले. डॉक्टर रावत यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले होते. तरी त्यांना करोनाची लागण झाली. मागील महिन्याभरामध्ये रुग्णालयातील ८० कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याची माहिती भारद्वाज यांनी दिली.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

दिल्लीमधील एकूण ३०० डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. सरोज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच एवढ्या मोठ्याप्रमाणात करोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयातील ओपीडी बंद ठेवण्यात आले आहेत. दिल्लीमधील गुरु तेज बहादूर रुग्णालयातील एका तरुण डॉक्टराच रविवारी करोनामुळे मृत्यू झाला. करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कोव्हिड कॉप्लिकेशन्समुळे काही तासामध्ये या डॉक्टरचा दुर्दैवी अंत झाला.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

७ हजार ४५० बेड्स राखीव…

दिल्लीमधील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने रविवारी १३ रुग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. करोना रुग्णांसाठी उपलब्ध असणाऱ्या बेड्सची ऑनलाइन माध्यमातून योग्य ती माहिती द्यावी असे आदेश दिल्ली सरकारने सर्व रुग्णालयांना दिलेत. सरकारने लोकनायक, जीटीबी, राजीव गांधी सुपर स्पेशलिटी, आंबेडकर रुग्णालय, बुराडी रुग्णालय, आंबेडकर नगर रुग्णालय, दीनदयाल रुग्णालय, देशबंधु रुग्णालय, संजय गांधी रुग्णालय, आचार्य भिक्षु रुग्णालय, एसआरसी रुग्णालय आणि जेएएसएस रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवली आहे. या १३ रुग्णालयांमध्ये आता करोना रुग्णांसाठी ७ हजार ४५० बेड्स राखून ठेवण्यात आलेत.