दिल्लीत सूर्यदेव कोपला? ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी!

दिल्ली, मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांप्रमाणेच, मुंगेशपूर आणि नरेला येथील दोन स्वयंचलित हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

देशाच्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सूर्यदेव आग ओकत असून मंगळवारी येथे तापमान जवळपास ५० अंशावर पोहोचलं होतं. राजस्थानातून येणारे उष्ण वारे आणि कडक उन्हामुळे दिल्लीच्या बाहेरील भागात तापमानात वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, दिल्लीत पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची स्थिती कायम राहणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीत जलसंकटही ओढावले आहे.

दिल्ली, मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांप्रमाणेच, मुंगेशपूर आणि नरेला येथील दोन स्वयंचलित हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. दिल्ली विद्यापीठाजवळील अया नगर आणि रिज येथील मॅन्युअल वेधशाळांनी अनुक्रमे ४७.६ अंश सेल्सिअस आणि ४७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शहराच्या सफदरजंगच्या बेस स्टेशनवर कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान आहे. मे २०२० मध्ये सर्वोच्च तापमान ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी कमाल तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे.

हे वाचले का?  Wankhede Stadium: मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियमच्या जन्माची रंजक कहाणी

स्कायमेट वेदरचे हवामानशास्त्र आणि हवामान बदलाचे उपाध्यक्ष महेश पलावत दि प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, ‘उघड जमीन असलेल्या मोकळ्या भागात रेडिएशन जास्त असते. थेट सूर्यप्रकाश आणि सावलीचा अभाव या भागांना अपवादात्मकपणे उष्ण करतात. वाऱ्याची दिशाही महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा पश्चिमेकडून वारे वाहतात, तेव्हा त्याचा सर्वात आधी या भागांवर परिणाम होतो. हे बाहेरचे ठिकाण असल्याने येथील तापमान झपाट्याने वाढते.

आयएमडीचे प्रादेशिक प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, नजफगढसारख्या ठिकाणी विविध कारणांमुळे तापमानात तीव्र वाढ होत आहे. राजस्थानमधून येणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा फटका बाहेरील भागांना पहिल्यांदाच बसला आहे. मुंगेशपूर, नरेला आणि नजफगढ या भागांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो.” तर, हवामान शास्त्रज्ञ चरण सिंग म्हणाले की, मोकळे क्षेत्र आणि ओसाड जमीन वाढलेल्या किरणोत्सर्गामुळे तापमान वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

हे वाचले का?  Rupee VS Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकावर; कारण काय?

दिल्लीत रेड अलर्ट

दिल्लीत मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे शहरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. IMD ने बुधवारच्या आपल्या अंदाजात म्हटले आहे की बुधवारी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवू शकते आणि जोरदार वारेही वाहतील. मात्र, आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील.

दिल्लीकरांवर जलसंकट

एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दिल्लीत जलसंकटही निर्माण झाले आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १ मे पासून हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडले नसल्याचा आरोपही मंत्र्यांनी केला आणि हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर दिल्ली सर्वोच्च न्यायालयात जाईल. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेजारी हरियाणा आणि उत्तर प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या दिल्लीतील गंभीर जलसंकट उभं राहिलं असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचले का?  रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्याक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये

दिल्लीच्या ६४ टक्के पाण्याच्या गरजा हरियाणामधून पूर्ण केल्या जातात. तर २६.५ टक्के उत्तर प्रदेशातून भागवल्या जातात, असे ताज्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. २०२२-२३ च्या सर्वेक्षणानुसार शहराची पाण्याची गरज दररोज १२९० दशलक्ष गॅलन (MGD) आहे.