दिवाळीचा उत्साह शिगेला!

फटाक्यांच्या माळांना संगीतमय आणि अन्य आतषबाजीची जोड मिळाल्याने गुरुवारी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आकाश उजळून निघाले.

.

नाशिक : फटाक्यांच्या माळांना संगीतमय आणि अन्य आतषबाजीची जोड मिळाल्याने गुरुवारी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आकाश उजळून निघाले आणि खऱ्या अर्थाने ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ अवतरल्याचा भास झाला. लक्ष्मीपूजनानंतर दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आली असून ग्राहकांच्या गर्दीने फुललेल्या बाजारपेठा दुपारनंतर रिक्त होऊ लागल्या. व्यापारी व व्यावसायिकांसाठी लक्ष्मी पूजनाचे सर्वाधिक महत्त्व आहे. त्याची जय्यत तयारी या वर्गाने आधीच केलेली होती. सकाळपासून फुलांनी सजविलेली दुकाने सायंकाळी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. वर्षभराचा जमा-खर्च मांडण्यात येणाऱ्या खतावण्या, चोपडय़ांचे पूजन करण्यात आले. कारखाने, बँका, व्यापारी आस्थापना, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी यंत्रसामग्रीचे विधिवत पूजन करण्यात आले. महानगरपालिकेत कोषागारातील तिजोरीचे महापौर सतीश कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, स्थायी सभापती गणेश गीते आणि गटनेते विलास शिंदे यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

घरोघरी नव्या केरसुणीची लक्ष्मी स्वरूपात पूजा करण्यात आली. पूजन झाल्यानंतर बालगोपाळांसह थोरा-मोठय़ांपर्यंत सारेच फटाके उडविण्यात मग्न झाले. प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते १० हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने आवाजाने हा परिसर दुमदुमून गेला. करोनामुळे व्यावसायिकांना वर्ष, दीड वर्ष र्निबधात जखडावे लागले होते. त्यातून सुटका झाल्याचा उत्साह बाजारपेठेत ठळकपणे दिसत होता. करोनाच्या संकटातून कायमस्वरूपी मुक्तता देण्याची भावनाही व्यापारी वर्गाकडून व्यक्त झाली. निवासी भागात आवाजापेक्षा संगीतमय, आतषबाजीच्या फटाक्यांना पसंती मिळाली. सिग्नल लाइट, कलर फ्लॅश, ब्रेक व पिकॉक डान्स, व्हीसल व्हीज अशा विविध प्रकारांची आकाशात जणू परस्परांशी स्पर्धा सुरू होती.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

दोन वर्षांनंतर पिपळ पारावर मैफल

दीपावलीनिमित्त विविध रंगांची उधळण सुरू झाली असली तरी या उत्सवाला सूरमयी साज चढविण्याची मोठी परंपरा शहर, परिसरात आहे. करोनामुळे गेल्या वर्षी असे कार्यक्रम मुख्यत्वे ऑनलाइन झाले. शिथिलीकरणात निर्बंध कमी झाले असले तरी यंदादेखील आयोजकांमध्ये परवानगी मिळेल की नाही याविषयी संभ्रम होता. अखेरीस करोनाचे नियम पाळून आयोजनाची परवानगी मिळाली, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाल्याने दीपावली पहाटच्या कार्यक्रमांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दिवाळीतील पाडवा पहाट आणि संगीताची मैफल हे गेल्या काही वर्षांत अतूट नाते बनले आहे. हे नाते वृद्धिंगत करणाऱ्या नेहरू चौकातील पिपळ पारावर दोन वर्षांच्या कालखंडानंतर शुक्रवारी पहाटे शास्त्रीय संगीताची मैफल रंगणार आहे. महानगरपालिका व संस्कृती नाशिक यांच्यातर्फे आयोजित मैफलीत किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित हरीश तिवारी सहभागी होत असल्याचे संस्कृती नाशिकचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी सांगितले.

हे वाचले का?  पुरवठा विभागाचे कार्यालय अपंगांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर