दुकानदारांची पुन्हा निराशा

निर्बंधाचा बाजारपेठेतील गर्दीवर परिणाम

नाशिक : संभ्रमावस्थेत सापडलेले व्यापारी, व्यावसायिक आणि कर्मचारी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडता येतील या आशेने बाजारपेठेत आले. परंतु, कठोर निर्बंधाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना माघारी परतावे लागले. मेनरोड, दहीपूल आणि सभोवतालच्या मुख्य बाजारपेठेत सकाळी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांची दुकानांबाहेर गर्दी झाली. पोलिसांच्या आवाहनानंतर ती ओसरली. जीवनावश्यक वगळता बहुतांश दुकाने बंद झाल्यामुळे बाजारपेठांमधील गर्दी ओसरली असली तरी रस्त्यांवरील वाहतुकीत फारसा फरक पडलेला नाही. रात्रीच्या संचारबंदीसाठी शहर पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन तपासणी नाके तयार करून सज्जता ठेवली आहे.

शहर, ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने स्थानिक पातळीवर निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरू झाली. जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने, हॉटेल, परमिट रुम, मद्याची दुकाने आदी बंद झाले आहेत. निर्बंधांविषयी व्यापारी वर्गात आधीच संभ्रम होता. त्यामुळे दुकाने उघडून व्यवसाय करता येईल, या अपेक्षेने सकाळी ते दुकानावर आले. दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी दाखल झाले. मेनरोड आणि आसपासच्या परिसरात सकाळी प्रत्येक दुकानाबाहेर मालक, कर्मचारी जमलेले होते. दुकान उघडायचे की नाही, याबद्दल खल सुरू होता. परंतु, पोलीस, महापालिकेच्या यंत्रणांनी निर्बंधांची जाणीव करून दिल्यावर त्यांना विचार बदलावा लागला. व्यवसाय पूर्णपणे बंद होणारे परवडणारे नसल्याची भावना उमटत आहे. टाळेबंदीत व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा २५ दिवस दुकान बंद ठेवल्यास व्यापारी वर्ग एक, दीड वर्ष मागे जाईल, अशी भावना वर्धमान नॉव्हेल्टीचे अजय भंडारी यांनी व्यक्त केली. आपल्या दुकानात सात कर्मचारी काम करतात. त्यांना दीड लाख रुपये वेतन द्यावे लागते. व्यवसाय बंद राहिल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन, गोदाम भाडे आणि कर्जाची परतफेड कशी करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरसकट पूर्णवेळ दुकाने बंद ठेवणे योग्य नाही. अर्थचक्र सुरळीत राखण्यासाठी किमान काही तास दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक व्यापाऱ्यांनी केली. उन्हामुळे दुपारी खरेदीसाठी कुणी येत नाही. त्यामुळे सायंकाळचे चार तास तरी दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, असे संबंधितांचे म्हणणे आहे.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद झाल्यामुळे खरेदीसाठी होणारी गर्दी ओसरलेली आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थाच्या गाडय़ा  वा तत्सम ठिकाणी ग्राहक पाहायला मिळतात. या निर्बंधांचा रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरू असली तरी अन्य खासगी वाहनांची गर्दी कायम आहे. उपनगरांमध्येही जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने बंद राहतील, यावर पोलीस, पालिका पथकांनी लक्ष ठेवले.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था श्रावणात बंद

प्रशासनाने सूचित केलेल्या निर्बंधांना शहरातील व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कुठेही विरोध झाला नाही. जीवनावश्यक वस्तुंची वगळता अन्य दुकाने पूर्णपणे बंद होती. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तीन तपासणी नाके करण्यात आले आहे. रात्री आठ वाजेपासून तिथे नाकाबंदी करून वाहनधारकांची तपासणी केली जाईल. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर वाहनांचा प्रवेश बंद करण्यासाठी लावलेल्या लोखंडी जाळ्या अद्याप तशाच ठेवण्यात आल्या आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

हे वाचले का?  Samruddhhi Highway : समृद्धी महामार्गावरील ८ किमीच्या बोगद्याची खासियत, इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या १० मिनिटांत कापलं जाणार

– दीपाली खन्ना (सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)