देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

देवळाली कॅम्प येथील फायरिंग रेंजवर तोफखान्याच्या सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट होऊन दोन अग्निविरांचा मृत्यू झाला आहे.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : देवळाली कॅम्प येथील फायरिंग रेंजवर तोफखान्याच्या सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट होऊन दोन अग्निविरांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी सरावावेळी अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. तोफेतील तांत्रिक दोष वा सदोष तोफगोळे त्यास कारक ठरत असल्याचे सांगितले जाते.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

तोफखाना दलाचे देशातील प्रमुख प्रशिक्षण केंद्र देवळाली कॅम्प येथे आहे. या ठिकाणी दलात दाखल होणाऱ्या अग्निविरांसह अधिकाऱ्यांना विविध अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता तोफखान्याचा सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली. इंडियन फिल्ड गन या तोफेतून अग्निवीर तोफगोळे डागत होते. त्यावेळी एका गोळ्याचा जागीच स्फोट होऊन मोहिल विश्वराज सिंग (२०) आणि सैफत शित (२१) हे दोन अग्निवीर गंभीर जखमी झाले.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

धातूचे तुकडे त्यांच्या शरीरात शिरले होते. हे लक्षात येताच नाईक सचिन चव्हाण, नायब सुभेदार सुदेश मामेन, नायब सुभेदार सुंदरराज यांनी तातडीने त्यांना देवळाली कॅम्प येथील लष्करी रुग्णालयात नेले. परंतु, दोन्ही अग्निविरांचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.