देशाच्या आत्मनिर्भर प्रयत्नात मुक्त विद्यापीठाचे योगदान मोठे!

भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून गौरव

भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने सुरू असलेल्या देशव्यापी प्रयत्नांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे योगदान फार मोठे असून ज्ञानगंगेचा हा प्रवाह कधीही न आटता सतत दूपर्यंत चिरंतन प्रवाहातच राहील, असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

येथील मुक्त विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने तसेच आभासी पद्धतीने  मंगळवारी पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून राज्यपाल कोश्यारी यांनी मार्गदर्शन केले. करोनाच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहचवावे याचा उत्तम वस्तुपाठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने घालून दिल्याचे राज्यपालांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आणि आभासी पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गोंदिया येथील शैलेश चुटे, मुंबई येथील सईद रूख्सार फातेमा सईद अहमद, निकेश कुऱ्हाडे या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आभासी पद्धतीने कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

सोहळ्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षांतील स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. दोन्ही वर्षांतील विविध विद्याशाखेतील पदव्यांची संख्या दोन लाख ९३ हजार ८५२ आहे. दोन्ही वर्ष मिळून ५२ स्नातकांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.