कोविड १० लसीकरण मोहिमेच्या ५२ व्या दिवशी २० लाख १९ हजार ७२३ जणांना लस देण्यात आली
आठ मार्च रोजी देशात वीस लाख लोकांना एकाच दिवशी करोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत २.३ कोटी लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोविड १० लसीकरण मोहिमेच्या ५२ व्या दिवशी २० लाख १९ हजार ७२३ जणांना लस देण्यात आली. त्यातील १७ लाख १५ हजार १८० लाभार्थ्यांना २८,८८४ सत्रांमध्ये पहिली मात्रा देण्यात आली. ३ लाख ४ हजार ३४३ आरोग्यसेवकांना व आघाडीवर काम करणाऱ्या लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली. १७ लाख १५ हजार ३८० लाभार्थ्यांमध्ये १२ लाख २२ हजार ३५१ लाभार्थी हे वयाच्या साठीवरील असून २ लाख २१ हजार १४८ जण हे ४५ ते ६० वयोगटातील सहआजाराचे लोक आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविड १८ लसीकरण मोहीम १६ जानेवारीला सुरू झाली होती. गेल्या चोवीस तासांत २० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत २,३०,०८,७३३ लोकांना ४,०५,५१७ सत्रांत लस देण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱ्यात ७०,७५,०१९ जणांना पहिली मात्रा तर ३७,३९,४७८ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. आघाडीच्या कर्मचाऱ्यात ६२,९२,३१९ जणांना पहिली मात्रा तर ३ लाख ३५ हजार ९७२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील सात लाख १८० लाभार्थी असून त्यांना पहिली मात्रा दिली आहे. साठ वर्षांवरील सहआजाराच्या ४३ लाख ७४ हजार १४५ जणांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांत कोविड रुग्ण संख्या वाढत आहे. २४ तासांत सापडलेले ८४.०४ टक्के रुग्ण त्या राज्यातील आहेत. २४ तासांत १५ हजार ३८८ नवीन रुग्ण सापडले असून महाराष्ट्रात ८७४४, केरळात १४१, तर पंजाबमध्ये १२२९ नवीन रुग्ण आहेत. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांत रुग्णसंख्या वाढली आहे. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब व मध्य प्रदेश या राज्यांत रुग्ण संख्या वाढत आहे. १ लाख ८७ हजार ४६२ रुग्ण उपचाराधीन असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १.६७ टक्के आहे.
देशात नवे १५ हजार ३८८ रुग्ण, ७७ जणांचा मृत्यू
देशात गेल्या २४ तासांत आणखी १५ हजार ३८८ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी, १२ लाख, ४४ हजार, ७८६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एक कोटी, आठ लाख, ९९ हजार ३९४ जण करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने मंगळवारी सांगण्यात आले.
देशात गेल्या एक दिवसात करोनामुळे आणखी ७७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख, ५७ हजार, ९३० वर पोहोचली आहे. सलग सहाव्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या एक लाख, ८७ हजार, ४६२ वर पोहोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या १.६७ टक्के इतके आहे. तर मृत्युदर १.४० टक्के इतका आहे.