देशात कडधान्य उत्पादनात तूट?…ब्राझीलमधून तीन हजार टन उडदाची आयात

कमी पाऊस, अवकाळी पाऊस, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसल्यामुळे यंदा देशात कडधान्य उत्पादनात तूट येण्याचा अंदाज आहे.

पुणे : कमी पाऊस, अवकाळी पाऊस, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसल्यामुळे यंदा देशात कडधान्य उत्पादनात तूट येण्याचा अंदाज आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडधान्याचा तुटवडा जाणवू नये, दर नियंत्रणात राहावेत, यासाठी केंद्र सरकारची जगभरातून कडधान्य आयातीसाठी धडपड सुरू आहे. नुकतीच ब्राझीलमधून तीन हजार टन उडदाची आयात करण्यात आली असून, आणखी २० हजार टनांची आयात होणार आहे.

केंद्रीय वाणिज्य सचिव रोहितकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात तूर, उडीद आणि मसूर डाळीचा तुटवडा जाणवत आहे. ही तूट कमी करण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी जगातील कडधान्यउत्पादक देशांतील व्यावसायिकांना भारताला जास्तीत जास्त कडधान्य निर्यात करण्याचे आवाहन केंद्राकडून केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून ब्राझीलमधून नुकतीच तीन हजार टन उडदाची आयात करण्यात आली असून, लवकरच आणखी २० हजार टनांची आयात होणार आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

कृषी विभागाच्या २०२३-२४च्या कृषी उत्पादनाच्या पहिल्या अंदाजानुसार, देशातील कडधान्य उत्पादनात मोठ्या तुटीचा अंदाज आहे. त्यात तुरीचे उत्पादन ३४.२१ लाख टन, मुगाचे १४.०५ लाख टन आणि उडदाचे उत्पादन १५.०५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात तुरीचे उत्पादन ३० लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. अशीच स्थिती अन्य कडधान्याच्या उत्पादनाबाबत आहे. त्यामुळे केंद्र सरकारसमोर मोठ्या प्रमाणावर कडधान्य आयात करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

इंडियन पल्सेस ॲण्ड ग्रेन्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, देशात दर वर्षी सरासरी २६० ते २८० लाख टन कडधान्याचे उत्पादन होते. त्यात यंदा १० ते १५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. मागील काही वर्षांपासून दर वर्षी २५ ते ३० लाख टन कडधान्याची आयात होते. यंदा त्यात वाढ होण्याचीच शक्यता आहे. प्रामुख्याने तूर, उडीद आणि मसूरची आयात वाढण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, म्यानमार, मोझांबिक, टांझानिया, सुदान आणि मालावी आदी देशांतून कडधान्य आयातीवर सरकारचा भर असणार आहे.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा

तूर, उडीद डाळ १८० रुपये किलोवर

सध्या बाजारात तूर आणि उडीद डाळीचा तुटवडा आहे. उडीद डाळ मागील दोन महिन्यांत २५ रुपयांनी वाढून १६० ते १८० रुपये किलोंवर आणि तूरडाळ २० रुपयांनी वाढून १५० ते १८० रुपयांवर गेली आहे. उडीद डाळीची मोठी टंचाई जाणवत आहे. मसूर डाळीची फारशी टंचाई नाही, दर ८५ ते ९० रुपयांवर स्थिर आहेत, अशी माहिती डाळींचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.

हे वाचले का?  पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?

कडधान्य उत्पादनाचा अंदाज

खरीप हंगाम – ७१.१८ लाख टन

रब्बी हंगाम – १८१ लाख टन

एकूण सरासरी उत्पादन – २७२ लाख टन