देशात ९१ दिवसानंतर आढळले ५० हजारापेक्षा कमी करोना रुग्ण

आज देशात (सोमवार) ९१ दिवसानंतर सर्वात कमी करोना रुग्ण आढळले.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला होता. मात्र सध्या देशात दिलासादायक वातावरण आहे. करोनाची दुसरी लाट ओसरतांना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. देशात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ९१ दिवसानंतर सर्वात कमी करोना रुग्ण आढळले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात एकूण ९१ दिवसांनंतर करोना रुग्णसंख्या कमी होऊन ५०,००० च्या खाली आली आहे. गेल्या २४ तासात देशात ४२,६४० करोना रुग्ण आढळले. या कालावधीत एकूण १,१६७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पॉझिटीव्ह दर ५ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. तसेच गेल्या २४ तासात ८१,८३९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

हे वाचले का?  Drishti IAS Institute : विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर कारवाई, महापालिकेने लावलं सील; कारण काय?

आतापर्यंत देशात २,९९,७७,८६१ करोना रुग्ण आढळले. तर २,८९,२६,०३८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तसेच ३,८९,३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६,६२,५२१ बाधित रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात सात रुग्णांमध्ये आढळला ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’

रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी महाराष्ट्रात डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट येऊ शकते असे तज्ञांनी सांगितले होते.

हे वाचले का?  Patanjali Ayurved : बाबा रामदेव यांच्यावरील ‘तो’ खटला अखेर संपला; पण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी संपवताना दिली तंबी!

भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. मोनोक्लोनल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही समजून घेण्यासाठी संशोधन चालू आहे.

करोना लसीकरणाबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे.

देशात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ३३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. यापूर्वी एकाच दिवशी ४८ लाख नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम होता, तो आज मागे टाकत दिवसभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरणात आले.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”