दैनंदिन गरज भागवून ५० ते ६५ मेट्रिक टन प्राणवायू शिल्लक

वाढत्या मागणीमुळे निर्मिती क्षमता वाढविण्यावर लक्ष

करोनाच्या वाढत्या संसर्गात प्राणवायूचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय पातळीवरून वाढीव निर्मिती करण्याकडे लक्ष दिले जात आहे. त्याअंतर्गत एका नव्या उद्योगास परवानगी देण्याबरोबर थकीत कर्जामुळे बँकेने ताब्यात घेतलेला उद्योग पुन्हा कार्यान्वित करता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १०४.२७ मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती होत आहे. त्यातील ८८.४८ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा होत आहे. दैनंदिन ५० ते ६५ मेट्रिक टनच्या आसपास प्राणवायू शिल्लक राहतो आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजारांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. मागील काही दिवसांत दररोज साडेतीन ते सात हजारांच्या दरम्यान नवीन रुग्ण आढळले. बाधितांमधील १३३८ रुग्ण अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रणेवर तर असून अडीच हजार रुग्णांना प्राणवायू व्यवस्थेचा आधार देण्यात आला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम श्वसन यंत्रणा, प्राणवायूयुक्त खाटा मिळणे अशक्य झाले आहे. मागील आठवड्यात एका खासगी रुग्णालयातील प्राणवायू संपुष्टात आल्याने तेथील रुग्णांना ऐन वेळी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची नामुष्की ओढावली होती.

हे वाचले का?  नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला

महामारीच्या काळात वैद्यकीय प्राणवायूची वाढती गरज पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. आगामी काळात वैद्यकीय प्रयोजनार्थ प्राणवायूची मागणी वाढत जाणार आहे. सध्या जिल्ह्यात १० जणांकडून वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती केली जाते. प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात दैनंदिन दोन टँकरद्वारे प्राणवायूचा पुरवठा होतो. त्याआधारे दैनंदिन १०४.२५ मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती केली जाते. आधीच्या शिल्लक साठ्यातील ५० मेट्रिक टन आणि नव्याने बनविलेला असा साधारणत: १५४.८२ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध असतो. त्यातील ८८.४८ मेट्रिक टन रुग्णालयांना वितरित केला जातो. यातून सोमवारी ६६.३४ मेट्रिक टन प्राणवायू शिल्लक राहिला.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

निर्मिती, पुरवठ्याची साखळी काही कारणांनी विस्कळीत झाल्यास प्राणवायूच्या तुटवड्याला सामोरे जावे लागेल. हे  लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्राणवायूची निर्मिती क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अलीकडेच एका उद्योगाने वैद्यकीय प्राणवायू निर्मितीसाठी परवानगी मागितली. संबंधितांच्या अर्जाची अन्न औषध प्रशासनाकडून पडताळणी सुरू आहे. तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीतील प्राणवायूशी संबंधित एक उद्योग थकीत कर्जामुळे बँकेने ताब्यात घेतलेला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तो सुरू करता येईल का, याची चाचपणी यंत्रणेकडून केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी द्रवरूप प्राणवायूसाठी टाकी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच औद्योगिक सिलिंडर हे वैद्यकीय सिलेंडर म्हणून वापरण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तशी कार्यवाही करण्याची तयारी केली जात आहे.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध