दोन कथा, एक विधान..

सुनील तांबे

दोन भिन्न भाषांत, पण साधारण एकाच काळात लिहिल्या गेलेल्या दोन कथा. सत्ता आणि भ्रष्ट आचार यांच्यातला परस्परसंबंध हेच या दोन्ही कथांचं आशयसूत्र. परंतु दोन निराळ्या संस्कृतींमध्ये त्या घडत असल्याने त्यांच्या विधानांमध्ये अंतर पडतं का? ‘सुष्ट-दुष्ट’ यासारख्या दुविधेबाहेरही वास्तव असतं, त्याकडे आपण कसं पाहातो?

‘पॉवर टेन्ड्स टु बी करप्ट अ‍ॅण्ड अ‍ॅब्सोल्यूट पॉवर करप्ट्स अ‍ॅब्सोल्यूटली’ हे उद्धरण एकोणिसाव्या शतकातील लॉर्ड अ‍ॅक्टन या ब्रिटिश इतिहासकार आणि राजकारण्याचं आहे. निरंकुश सत्ता निरंकुशपणे भ्रष्ट होते, या वचनाचे नवे आयाम या काळात शोधणं निकडीचं आहे. अशा काळात सत्ता आणि भ्रष्ट आचार हे आशयसूत्र असणाऱ्या दोन कथा वाचनात आल्या. हिंदी लेखक नागार्जुन यांची ‘इनाम’ आणि गॅब्रिएल गार्सिया मार्खेज या कोलंबियन लेखकाची ‘वन ऑफ दीज डेज्’! या दोन्ही कथा अल्पाक्षरी आहेत. एक कथा हिंदूी भाषेतली आहे, लेखकाचा भाषिक प्रदेश प्रामुख्याने बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश वा पूर्वाचल आहे. दुसरी कथा स्पॅनिश भाषेतली असली तरी कोलंबिया या दक्षिण अमेरिकेतल्या देशातली आहे. नागार्जुन यांचा जीवनकाळ १९११ ते १९९८ आहे, तर मार्खेज यांचा जीवनकाळ १९२७ ते २०१४ हा आहे. दोन लेखकांमध्ये एका पिढीचं अंतर आहे, पण त्यांचा लेखनकाळ बहुधा एकच असावा. कारण या दोन्ही कथा कथालेखकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात लिहिल्या असाव्यात असा कयास बांधता येतो. एकच आशयसूत्र दोन वेगळ्या भाषिक संस्कृतींमध्ये कसं अभिव्यक्त होतं यावरून त्या दोन भाषिक संस्कृतींबद्दलही आपल्याला थोडीफार माहिती मिळते. हवामानाप्रमाणेच अर्थकारण, राजकारण, साहित्य, संस्कृती जागतिक असतात.

‘इनाम’ ही नागार्जुन यांची कथा केवळ २७५ शब्दांची आहे. ती उद्धृत केली वा तिचा अनुवाद केला तरीही कॉपीराइट कायद्याचा भंग होईल. कथेचा सारांश पुढीलप्रमाणे.. हरणाचं मांस खाताना लांडग्याच्या गळ्यात एक हाडुक अडकतं. तो वेदनेनं बेजार होतो. त्याला खाता-पिता येत नाही. गळा सुजतो. हैराण होऊन तो येरझाऱ्या घालत असतो. नदीकिनारी त्याला सारस पक्षी दिसतो. लांडगा सारसाकडे जातो आणि गयावया करत म्हणतो, ‘माझ्या गळ्यातलं हाडूक काढ आणि मला वेदनांपासून मुक्त कर. तू मागशील ते इनाम मी देईन.’ सारस पक्ष्याची मान आणि चोच लांब असते. सारस काही क्षणांत लांडग्याला वेदनामुक्त करतो. लांडगा खूश होतो. सारस म्हणतो, ‘माझ्या इनामाचं काय?’ लांडगा चिडतो, त्याचे डोळे लाल होतात, ‘गाढवा, लांडग्याच्या तोंडातून तुझी मान सहीसलामत बाहेर निघाली यापेक्षा आणखी कोणतं इनाम तुला हवं? काही क्षणांत चट्टामट्टा करेन तुझा. जा फूट इथून.’ सारस भीतीने थरथर कापू लागतो. मनातल्या मनात म्हणतो, कधीही दुष्टावर विश्वास ठेवू नये, त्यांच्या गोड बोलण्याला फसू नये.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

‘वन ऑफ दीज डेज्’ ही कथा ९०० शब्दांची आहे. कोलंबियातील यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. हे यादवी युद्ध लिबरल (उदारमतवादी) आणि कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह (पुराणमतवादी) यांच्यामध्ये सुरू होतं. देशातल्या एका बारक्या गावात एक दंतवैद्य असतो. तो नोंदणीकृत दंतवैद्य नाही. त्याचा दवाखानाही साधासुधा आहे. दंतवैद्यकाला लागणारी आवश्यक साधनसामग्रीही त्याच्यापाशी नाही. हा दंतवैद्य लिबरल पक्षाचा पाठीराखा आहे. बंडखोरांना मदत करणारा आहे. गावाचा मेयर म्हणजे गावाचा सत्ताधीश, तो कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षाचा आहे. मेयरची दाढ सुजलीय. खूप दुखते आहे. इतकी की, तो एकाच गालाची दाढी करायचा. गावातल्या एकमेव दंतवैद्याकडे जायची त्याला भीती वाटत असते. अखेर निरुपायाने तो त्या दवाखान्यात जातो. दंतवैद्याचा मुलगा मेयर आल्याची वर्दी देतो. दंतवैद्य आतूनच सांगतो, ‘मी दवाखान्यात नाही असं त्याला सांग.’ मेयर वैतागतो, ‘त्याला सांग, त्याचा आवाज मला ऐकू येतोय. मी आतमध्ये येऊन गोळी घालेन.’ दंतवैद्य उत्तरतो, ‘त्याला सांग, ये आत आणि घाल गोळी.’ प्रत्युत्तर दिल्यावर आपल्या टेबलाच्या खणात पिस्तुल आहे याची खात्री दंतवैद्य करतो. मेयर आत येतो. त्याचा चेहरा वेदनेनं विदीर्ण झालेला असतो. दंतवैद्य त्याला तपासतो आणि म्हणतो, ‘दाढ काढावी लागेल, पण माझ्याकडे लोकल अ‍ॅनास्थेशिया नाही. त्यामुळे भूल दिल्याशिवाय दात उपटावा लागेल.’ मेयर म्हणतो ठीक आहे. आमच्या वीस जणांच्या हत्येची किंमत तू आता मोजशील, असं म्हणून दंतवैद्य मेयरची दाढ उपसतो. असह्य़ वेदनेने मेयरच्या डोळ्यांत अश्रू येतात. ‘डोळे पूस आणि घरी जाऊन मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कर,’ दंतवैद्य म्हणतो. मेयर काही क्षणांनंतर केबिनमधून बाहेर पडतो. दंतवैद्य विचारतो, ‘बिल कुठे पाठवू, घरी की ऑफिसात? मागे वळूनही न पाहता मेयर उत्तरतो- ‘कुठेही पाठव, काय फरक पडतो.’

नागार्जुन यांची कथा जंगलात, एका नदीच्या किनारी घडते. लांडगा हा शोषकांचा प्रतिनिधी आहे. हरिण शोषिताचं प्रतिनिधित्व करतं. हरणाचं हाड घशात अडकल्यानं लांडगा बेजार झाला आहे. त्याला काहीही खातापिता येत नाही. हरणाचं हाड कदाचित लांडग्याच्या सदसद्विवेकाचं प्रतीक असू शकतं. एका दुर्बळाच्या कौशल्याचा उपयोग करून त्या वेदनांपासून लांडगा मुक्त होतो आणि त्या दुर्बळाला कबूल केलेलं इनाम देणं सोडाच, पण वर धमकावतो. भेदरलेला सारस, दुष्टाच्या गोड शब्दांवर कधी विश्वास ठेवू नये हे पुटपुटत असतो.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर

‘नागार्जुन की कथाएँ सोद्देश्य हैं। वे अपनी संक्षिप्त कथाओं का समापन निष्कर्ष के तौर पर एक-दो खास पंक्तियों के साथ ही करते हैं। जैसे इनाम कहानी में वे सारस-भेडिये की कथा कहते हुए अंत में कहते हैं, रोते हों फिर भी बदमाशों पर करना न यकीन। मीठी बातों से मन होना छलियों के अधीन। करना नहीं यकीन। खलों पर करना नहीं यकीन। अगर कथा-कहानी हमारा बोध न जाग्रत कर सके, हमें अपने समय से समुचित संवाद करने या आत्म-मंथन के लिए विवश न कर सके, तो वह कहानी नहीं हो सकती। कहानी कहनपन के साथ तो हो, साथ ही वह हमारा परिमार्जन बही करती चले। नानी-दादी की कहानियाँ क्या थीं? वे बच्चों के मनोरंजन के लिए ही कथा नहीं कहतीं, उसके माध्यम से मनुष्यता के या सामाजिकता के संस्कार भी प्रक्षेपित करने की कोशिश करती हैं। नागार्जुन भी बिल्कुल सही अर्थो में बाबा की भूमिका में दीखते हैं और अपनी कविताओं की तरह अपनी कथाओं के माध्यम से लोक परिष्कार और लोक संस्कार का काम करते चलते हैं..’ असं स्पष्टीकरण गिरीश पंकज या समीक्षकाने आपल्या निबंधात (‘नागार्जुन का कथा साहित्य’) नोंदवलं आहे.

‘वन ऑफ दीज डेज्’ या कथेतला मेयर गावाचा सर्वसत्ताधीश आहे. पण दातदुखीने हैराण झालेला आहे. एका गरीब दंतवैद्याला धमकावण्याशिवाय या वेदनेतून मुक्त होण्याचा अन्य मार्ग त्याच्यापाशी नाही. मात्र दंतवैद्यही दुर्बळ नाही. आपलं कौशल्य हीच आपली सत्ता आहे हे तो जाणतो. म्हणून तर तो शांतपणे म्हणतो, ‘त्याला (मेयरला) सांग, आतमध्ये येऊन गोळी घाल.’ पण दंतवैद्याची ही सत्ता वा मेयरवरचं नियंत्रण अल्पकालीन असतं. व्यावसायिक निष्ठेनं मेयरशी वर्तन करायचं की राजकीय निष्ठेपोटी मेयरला गोळी घालायची, असाही प्रश्न दंतवैद्यापुढे आहे. व्यावसायिक निष्ठेला दंतवैद्य प्राधान्य देतो. गरिबाच्या विद्रोहाने मेयरच्या सत्तेला तात्पुरता का होईना, पण शह बसतो. त्यातून भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. मेयरचा सडका दात या कथेत भ्रष्टाचाराचं प्रतीक बनतो. पण ही प्रक्रिया चक्राकार आहे. कधी राजकीय सत्ता यशस्वी होईल तर कधी सामान्य माणूस, असंही ही कथा सुचवते.

हे वाचले का?  पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?

‘इनाम’ कथेतला लांडगा आणि ‘वन ऑफ दीज डेज्’ कथेतला मेयर सारखेच वाटतात. पण सारस आणि दंतवैद्य यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपल्या अंगभूत कौशल्यामुळे अल्पकाळ का होईना, आपण लांडग्याला नमवू शकतो ही जाण ‘इनाम’ कथेतल्या सारस पक्ष्याकडे नाही. परिणामी तो घाबरून पुटपुटतो, ‘दुष्ट माणसांना कधीही मदत करू नये.’ ‘वन ऑफ दीज डेज्’ अधिक प्रगल्भ कथा आहे. सुष्ट-दुष्ट, काळं-पांढरं अशा बाळबोध परिप्रेक्ष्यातून ती वास्तवाकडे पाहत नाही. वास्तवाच्या गुंतागुंतीची प्रगल्भ दखल घेत वाचकाला विचाराला प्रवृत्त करते.

भारतातील डावे असोत की उजवे वा आंबेडकरवादी. सुष्ट-दुष्ट, काळं-पांढरं, साम्राज्यवादी-देशीवादी, ब्राह्मणी-अब्राह्मणी, आंबेडकरी-मनूवादी अशा बायनरी वा द्विकेंद्री दृष्टीतून ते वास्तवाकडे पाहतात. त्यामुळे संघ-भाजप यांच्या निरंकुशतेला आव्हान देण्याबाबत ते अजून चाचपडत आहेत. नागार्जुन आणि मार्खेज यांच्या कथांचं आशयसूत्र एकच आहे, परंतु दोन संस्कृतींमुळे त्यांच्या विधानांमध्ये अंतर पडतं का? दक्षिण अमेरिकेतील साहित्य युरोप आणि दक्षिण अमेरिका अशा दोन संस्कृतींवर पोसलं गेलं आहे. आधुनिक भारतीय साहित्यावरही युरोपीय संस्कृतीचा प्रभाव आहे. माणूस-माणूस, माणूस-निसर्ग, माणूस-विश्व आणि माणसाचं आपल्याशी असलेलं नातं यासंबंधी शोध घेणं हे युरोपीय संस्कृतीचं महत्त्वाचं लक्षण आहे. आधुनिक भारतीय साहित्यानं हे लक्षण आत्मसात केलेलं नाही. मराठी साहित्य मराठी भाषकांना, तर हिंदी साहित्य हिंदी भाषकांना संबोधित करतं आणि आपापल्या भाषिक विश्वापुरतंच विधान करतं.

लेखकाचे ‘मार्खेजची गोष्ट’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.