धमक्यांप्रकरणी अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट

“मी स्वत: मराठा कुटुंबात जन्मले, त्यामुळे मी विनंती करते..”

एका मुलाखतीत अनवधानाने छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांना व ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या टीमला सतत धमक्यांचे फोन येतायत. याप्रकरणी मालिकेच्या टीमने नुकतीच भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. अलका कुबल यांनी या भेटीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

‘सतत येणारे धमक्यांचे फोन आणि तथ्यहीन आरोप यांच्याविरोधात आम्ही उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. मी स्वत: मराठा कुटुंबात जन्मले, त्यामुळे मी विनंती करते की खोट्या आरोपांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही धर्म किंवा जातीविरोधात आम्ही नाही’, असं त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

काय आहे प्रकरण?

एका मुलाखतीत अलका कुबल यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेविषयी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी जाहीर माफीसुद्धा मागितली होती. “आमच्या मालिकेचा जो वाद सुरू होता, त्याबद्दल मी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. अनवधानाने माझ्या तोंडून एकेरी उल्लेख निघाला याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते”, असं त्या या व्हिडीओत म्हणाल्या होत्या.