अहिराणी संमेलनाबरोबच आहिराणी भाषेचे संवर्धन करीत भाषा जपण्याचे काम आपण केले पाहिजे.
धुळे: धुळे येथे २१ आणि २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात खान्देशासह महाराष्ट्र, सुरत(गुजरात), मध्यप्रदेशातील साहित्यिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. धुळ्यात संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. येणाऱ्या पिढ्यांपर्यंत अहिराणी भाषा आणि खान्देश संस्कृती पोहचली पाहिजे, ती जपली गेली पाहिजे म्हणून अखील भारतीय अहिराणी साहित्य संमेलन होणार असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले.
धुळ्यात होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर खान्देशातील साहित्यिकांची बैठक पार पडली. बैठकीत संमेलनाच्या पुर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला. पाचव्या अ. भा. अहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. कुणाल पाटील, अध्यक्ष सुभाष आहिरे,अश्विनीताई पाटील, रमेश बोरसे, ज्येष्ठ साहित्यिक जगदिश देवपूरकर, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार पाटील यांनी आज जगात आपली भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी स्पर्धा आणि संशोधन सुरु असल्याचे सांगितले.
भाषा व आपल्या मातीविषयी अस्मिता जपली पाहिजे, अहिराणी संमेलनाबरोबच आहिराणी भाषेचे संवर्धन करीत भाषा जपण्याचे काम आपण केले पाहिजे. जिथे जिथे अहिराणी भाषा व खान्देशी माणूस असेल तिथे तिथे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक सुभाष अहिरे, कवी देवपूरकर, प्रभाकर शेळके आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष रमेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले.