नाट्यशास्त्र पदविका अभ्यासक्रम मुहूर्ताच्या प्रतीक्षेत

मुक्त विद्यापीठाला करोनाचा फटका

चारुशीला कुलकर्णी

करोनाची झळ सर्वच क्षेत्रांना बसत असताना शिक्षण क्षेत्रही त्यास अपवाद राहिलेले नाही. या काळात शालेय, महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहिले. तथापि, प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम ऑनलाइन घेणे अवघड ठरले. याच कारणास्तव येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा नाट्यशास्त्र पदविका हा नवीन अभ्यासक्रम दोन वर्षांपासून सुरू होऊ शकलेला नाही. त्यास प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले आहे. नव्या शैक्षणिक वर्षात तरी त्यास मुहूर्त लाभेल का, याची अनेकांना भ्रांत आहे.

कला हा जीवनाचा अविभाज्य भाग. गेल्या काही वर्षांत मनोरंजन विश्वााला आलेली झळाळी पाहता या क्षेत्राकडे युवावर्ग मोठ्या संख्येने आकर्षित झाला आहे. कलेकडे असणारा ओढा लक्षात घेऊन मुक्त विद्यापीठाने नाट्यशास्त्र पदविका अभ्यासक्र म सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी समिती गठित करत पदविका अभ्यासक्र माची आखणी झाली. यामध्ये कायिक अभिनय, वाचिक अभिनय, देहबोली असे नाट्यशास्त्राच्या विविध अंगांवर प्रकाश टाकणाऱ्या पैलूंचा अंतर्भाव करण्यात आला. यासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला. दोन सत्रांत हा अभ्यासक्र म होणार आहे. यामध्ये २० टक्के  अभ्यास आणि ८० टक्के  प्रात्यक्षिक अशी आखणी करण्यात आली. पहिल्या सत्रात विद्यार्थी स्वत: एकांकिका बसविणार असून दुसऱ्या सत्रात नाट्य क्षेत्रातील नामवंत कलावंत त्यांना मार्गदर्शन करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकांकिका महोत्सव भरविण्यात येईल. याशिवाय थिएटर खेळ, शारीरिक अभिनय, व्यायाम आदींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  त्रुटींसाठी निकष लावा, सुविधा द्या! केंद्राच्या उच्चस्तरीय परीक्षा सुधारणा समितीकडे सूचनांचा ओघ

पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. तथापि, करोनाच्या संकटामुळे प्रात्यक्षिकावर आधारित हा अभ्यासक्रम सुरू करता आला नाही. करोनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. त्यामुळे एकूण प्रवेशक्षमतेत कपात करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात समन्वयक सचिन शिंदे यांनी माहिती दिली. नाट्यशास्त्र पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरू होणार आहे. मागील वर्षी अभ्यासक्रम सुरू होणार होता. राज्यभरातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विचारणा के ली. परंतु, हा अभ्यास प्रत्यक्षात शिकविण्यात येणार आहे. पुढील मे महिन्यात जाहिरात देऊन प्रवेशप्रक्रि या सुरू करण्यात येईल. जास्तीतजास्त २० जणांना प्रवेश देण्यात येईल. मुक्त विद्यापीठाच्या आवारात हे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल, असे शिंदे यांनी नमूद केले.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

मुक्त विद्यापीठाचा नाट्यशास्त्र पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरू होईल. या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून काही जणांनी प्रवेशाची विचारणा केली. करोनाचा संसर्ग लक्षात घेता लवकरच हे वर्ग सुरू होतील.

– डॉ. दिनेश बोंडे (कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)