शहर परिसरातील बाजारपेठेत सर्वत्र ‘जिंगल बेल्स, जिंगल बेल्स’चे सूर निनादू लागले आहेत.
मंदीच्या सावटावर मात; रंगीबेरंगी पताका, आकाश कंदील, मेणबत्त्यांसह येशू जन्माचे देखावे
नाशिक : नाताळच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाला उधाण आले असताना राज्य शासनाने करोना काळात रात्री संचारबंदी लावल्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी निराशा आहे. शहर परिसरातील बाजारपेठेत सर्वत्र ‘जिंगल बेल्स, जिंगल बेल्स’चे सूर निनादू लागले आहेत. शहरातील बाजारपेठा नाताळमय झाल्या असून रंगीबेरंगी पताका, चांदणीच्या आकाराचे आकाश कंदील, विविध आकाराच्या मेणबत्त्या, येशू जन्माचे देखावे, नाताळ गोठे खरेदी करण्यासाठी ख्रिस्ती धर्मीयांनी गर्दी केली आहे. तसेच हरणाची शिंगांची प्रतिकृती असलेले चष्मे, पट्टा आणि नाताळच्या टोप्या बाजारात आल्या आहेत.
ख्रिसमसमध्ये भेटायला येणारा ‘सांताक्लॉज’ लहानग्यांचा आवडता. यंदा मुलांसाठी खास सांताक्लॉज पेहराव बाजारात आला आहे. २०० रुपयांपासून विक्रीस उपलब्ध असणारे हे लहान अंगरखे अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी हौसेने खरेदी करत असल्याचे विक्रे ते ऋषिकेश कोरडे यांनी सांगितले. नाताळात ख्रिसमस ट्रीचे असणारे महत्त्व पाहता ४० रुपयांपासून ७०० रुपयांर्पयंत लहान-मोठय़ा आकारातील ख्रिसमस ट्री लक्ष वेधून घेत आहेत. ट्री सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या अनेक आकर्षक बेल, रंगीबेरंगी चांदण्या, चेंडू, विद्युत रोषणाई, भेटवस्तूंचे पुडे अशा निरनिराळ्या वस्तू विक्रीस असून त्यांची किंमत ५० ते २०० रुपयांपर्यंत आहे. घरसजावटीसाठी ख्रिसमसचे स्टिकर, चमचमत्या माळा, तोरण ७० रुपयांपासून उपलब्ध आहेत. पांढऱ्या रंगाच्या स्नो मॅनच्या बाहुल्या, शोभिवंत माळा, सांताक्लॉजचे मोजे, मुखवटे यांना मागणी असून १०० रुपयांपासून १३०० रुपयांपर्यंत विक्री केली जात असल्याचे कोरडे यांनी सांगितले.
शाळांत नाताळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांची तयारी होत आहे. अनेक दुकानांबाहेर ठेवण्यात आलेले मोठय़ा आकाराचे हलते सांताक्लॉज, तसेच हवा भरलेल्या सांताक्लॉजच्या प्रतिकृती ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. नाताळ सणासाठी खास केक, पेस्ट्रीज, चॉकलेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नाताळ आणि त्याला जोडून येणाऱ्या नववर्षांच्या निमित्ताने बहुतांश दुकानदारांनी तसेच उपाहारगृहांनी ग्राहकांसाठी भरघोस प्रमाणात सवलत दिली आहे. महागाई अथवा मंदीचा कोणताही परिणाम नाताळच्या खरेदीवर झालेला नसून दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळच्या खरेदीचा उत्साह टिकून आहे. देवळाली गाव परिसरात चर्चबाहेर करोना विषयी गाण्यांद्वारे प्रबोधन केले जात आहे.
सिक्रेट सांताची धमाल
नाताळानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सिक्रेट सांताची संकल्पना लोकप्रिय होत आहे. यात विद्यार्थी एकमेकांच्या नावाच्या चिठ्ठय़ा टाकून ज्याचे नाव येईल त्याला न सांगता अनपेक्षितपणे भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. जणू खुद्द सांताक्लॉजने भेटवस्तू दिल्याचा आनंद यानिमित्ताने लुटला जात आहे. ‘सिक्रे ट सांता’ म्हणून भेटवस्तू देताना आपल्या मित्र अथवा मैत्रिणीच्या गरजेचा आणि आवडीचा विचार करून खिशाला परवडणारी भेटवस्तू घेतली जात आहे.