नाशिकचा अपमान ! १५ आमदार असूनही कुंभमेळ्यासाठी मंत्री ‘आयात’

नाशिक दौऱ्यात सावंतांचे ताशेरे; कुंभमेळा कामात भ्रष्टाचाराचा इशारा (छायाचित्र - Arvind Sawant FB)
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 3 मिनिट )

महायुती सरकारला जिल्ह्यातील १५ आमदार आणि काही मंत्र्यांमधून एकालाही नाशिकचे पालकमंत्री देता आले नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी जामनेरमधून मंत्री आयात करावा लागला. हा नाशिककरांचा अवमान असून कुंभमेळ्याचे नेतृत्व नाशिकच्या व्यक्तीने करायला हवे, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी कुंभमेळामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा नामोल्लेख न करता टिकास्त्र सोडले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्यांवरून सत्ताधाऱ्याच्या कारभारावर ताशेरे ओढले. कुंभमेळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ शकतो. दिग्गज नेते यात असून त्याबाबत ते माहिर आहेत. निवडणूक रोखे (इलेक्ट्रोल बाँड), पीएम केअर आदीतून त्यांची बुद्धी कशी चालते, हे लक्षात येते, असे सांगत सावंत यांनी नाशिककरांनी सावध राहण्याची गरज व्यक्त केली. भ्रष्टाचार रोखण्यासाठी नाशिक महापालिकेत परिवर्तन होणे आवश्यक आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना बरोबर घेऊन भाजप व्याभिचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिकमधील एबी अर्ज वाटपातील गोंधळावर त्यांनी बोट ठेवले. ठाकरे गटाचे एबी अर्ज पक्ष कार्यालयातून वाटले गेले. तर विरोधकांचे एबी अर्ज कंत्राटदाराच्या घरातून वाटप झाल्याचा टोला त्यांनी हाणला.

See also  पिंपरीत अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा

सत्ताधाऱ्यांनी राज्यात सुरू केलेल्या बिनविरोध पायड्यांची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. निवडणूक लढायची नाही, धाक दडपशाही किंवा प्रलोभने दाखवून प्रतिस्पर्ध्याला माघार घ्यायला लावायची. मुंबईत २०६ क्रमांकाच्या प्रभागात खुद्द विधानसभा अध्यक्षांनी स्वत:च्या भावाला बिनविरोध करण्यासाठी अर्ज घेऊ दिला नाही, अपक्षाला धमक्या दिल्या. गुंड त्याच्या घरी जाऊन बसले होते, असा आरोप सावंत यांनी केला. या घटनाक्रमात निवडणूक आयोग काय करतेय. कारवाई कधी करणार, असे प्रश्न त्यांनी केले. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे दोन माजी महापौर भाजपमध्ये जाण्यामागे प्रलोभने, धाक, तिकीट मिळविणे हे कारण असल्याचे त्यांनी सूचित केले. ठाकरे गट आणि मनसेच्या प्रचारार्थ नऊ जानेवारी रोजी नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित सभा होणार आहे. त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ही सभा होणार असून त्यातून नाशिकमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा सावंत यांनी केला.