नाशिकच्या चलार्थपत्र मुद्रणालयाची नोटा छपाईची क्षमता वाढणार

पाच वर्षांत १४०० कोटींची अत्याधुनिक यंत्रे बसविण्याचे नियोजन

पाच वर्षांत १४०० कोटींची अत्याधुनिक यंत्रे बसविण्याचे नियोजन

नाशिक : शहरातील चलार्थपत्र मुद्रणालयात पाच वर्षांत १४०० कोटींची अत्याधुनिक छपाई यंत्रणा कार्यान्वित करून चलनी नोटा छपाईची क्षमता वाढवण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात दीड वर्षांत साडेतीनशे कोटींची यंत्रणा बसविल्यानंतर वर्षांकाठी एक हजार दशलक्षने नोटांची छपाई वाढणार आहे. सद्य:स्थितीत मुद्रणालयात वर्षांला साडेपाच ते सहा हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.

देशाची नोटांची गरज भागविणाऱ्या या मुद्रणालयात कित्येक वर्षांपासून आधुनिकीकरणाची मागणी केली जात आहे. त्याची दखल घेत आधुनिक छपाई यंत्रासह या कामात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध नवीन यंत्रणा कार्यान्वित केल्या जाणार आहेत. ३५० कोटींच्या यंत्रणेची मागणी नोंदविली गेली आहे. सध्या मुद्रणालयात १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नवीन रचनेच्या नोटांची छपाई केली जाते. कामगारांच्या सहकार्याने नव्या यंत्रणेवर काम करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पेलली जाईल, असा विश्वास प्रेस मजदूर संघाचे जगदीश गोडसे यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला

तंत्रज्ञानदृष्टय़ा जुन्या यंत्रामुळे मुद्रणालयात उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. तांत्रिक अडचणींचा अडथळा असूनही कामगारांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुद्रणालयाशी स्पर्धा करून चांगले उत्पादन दिले आहे.

निश्चलनीकरणाच्या काळात वर्षभर सुट्टी न घेता कामगारांनी अहोरात्र नोटांची छपाई करून चलनटंचाई कमी केली होती. मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणाच्या मागणीसाठी कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधानांनी ही मागणी मान्य केली.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

अत्याधुनिक यंत्रणा आल्यानंतर अनेक कामे एकाचवेळी होतील. देशाचे सर्व पारपत्र नाशिक रोडच्या मुद्रणालयात छापले जातात. परंतु ते बँकेच्या खातेपुस्तकाप्रमाणे आहेत. आता त्याचे स्वरूप ई पारपत्रात बदलणार आहे. त्यात भ्रमणध्वनीसारखी ‘इलेक्ट्रानिक चीप’ असेल. पारपत्रासाठीच्या दोन यंत्राचे आधुनिकीकरण झाले आहे. तिसरे नवीन यंत्र वर्षभरात येईल.

नव्या वर्षांत ई पारपत्र

’अनेक वर्षांपासून रखडलेल्या विषयास मुद्रणालय महामंडळाने मान्यता दिल्यामुळे ई पारपत्राची छपाई वर्षांला तीन कोटींपर्यंत जाईल.

’त्यामध्ये अगोदरचे दीड कोटी पारपत्र बदलून देणे आणि नवीन दीड कोटींची मागणी पूर्ण करण्याचा अंतर्भाव आहे.

’ई पारपत्रासाठी काही काम परदेशात तर काही देशात हैदराबाद आणि नोईडा येथे होऊन ते नाशिक रोडच्या मुद्रणालयात येईल.

हे वाचले का?  सातारा : कोयना धरणात यंदा आजवर १४१ अब्ज घनफूट जल आवक, वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस

’२०२१ च्या पूर्वार्धात देशातील पहिले ई पारपत्र तयार होईल. सध्या मुद्रणालयात वर्षांला ४५० कर्मचारी दीड कोटी पारपत्रांची छपाई करतात.