“नाशिकच्या जागेवरुन वेगळी विधाने करणे अयोग्य”, राधाकृष्ण विखे यांचा भुजबळ यांना टोला

महायुतीत तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ वादात सापडला आहे.

नाशिक : आम्ही राज्यात काम करणारी मंडळी असल्याने दिल्लीतून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना काय सूचना केली, त्याबद्दल कल्पना नाही. भाजपची क्षमता जास्त असल्याने नाशिकच्या जागेची आम्ही मागणी केली असून ती गैर नाही. यावर महायुतीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्यामुळे कुणी असे सांगितले, तशा सूचना केल्या, अशी विधाने करणे योग्य नसल्याचे सांगत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ यांना टोला हाणला.

हे वाचले का?  नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार

महायुतीत तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ वादात सापडला आहे. दिल्लीत आपल्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास दिल्याचे भुजबळ यांनी शनिवारी सांगितले. शिवसेना शिंदे गटाचा ही जागा मित्रपक्षांना देण्यास विरोध आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाशिक मतदारसंघात भाजपचे शंभरपेक्षा अधिक नगरसेवक असून ही जागा भाजपला द्यावी म्हणून आमचा आग्रह राहिल्याचे नमूद केले. भाजपला जागा मिळाल्यास निश्चितपणे महायुतीचा उमेदवार निवडून आणला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  बेशिस्तीविरोधात कारवाई, वाहतूक पोलिसांसह प्रादेशिक परिवहनची मोहीम

नगरमध्ये सुजय विखे यांच्यासमोर मागील निवडणुकीतही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला होता. शरद पवार हे तळ ठोकून होते. परंतु, जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करते. ही लढाई व्यक्तिगत पातळीवर जाईल, हा विरोधकांचा भ्रम आहे. इंडिया आघाडीला अद्याप त्यांचा नेता ठरवता आलेला नाही. उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते बेछूट आरोप करतात. खरेतर त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष घरात बसून राहिले. आता ते विकासाच्या गप्पा मारत असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

हे वाचले का?  छगन भुजबळ यांचे मंत्रिपद जाण्यामागे अनेक कारणे