दोन्ही सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले. तेव्हा बेकायदेशीर व्याजाचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले.
नाशिक : बेकायदेशीरपणे सावकारी करुन कर्जदारांची मालमत्ता कवडीमोल दराने हडप करून कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दोन सावकारांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सावकारांच्या घरातून ४४ करारनामे, ४४ कोरे मुद्रांक, १०७ धनादेश आणि कर्ज व व्याजाच्या नोंदी असलेल्या तीन खतावण्या मिळून आल्या. याबाबत सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक रवींद्र गुंजाळ (रा. पेठरोड) यांनी तक्रार दिली. प्रवीण काकड (३८, मानकर मळा) आणि पोपट काकड (४१, शांतीनगर मखमलाबाद) अशी संशयित सावकारांची नावे आहेत. याबाबत रामदास मोगल यांनी निफाडचे सहकार निबंधक यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत दोन्ही सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले. तेव्हा बेकायदेशीर व्याजाचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले. संशयितांच्या घरझडतीत २००८ पासून बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे वाटप केल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. दोघा सावकारांच्या घरात १२५ ते १५० जणांना मोठ्या रकमेचे वाटप करण्यात आल्याची कागदपत्रे मिळाली. या संदर्भातील ४४ करारनामे, ४४ कोरे मुद्रांक आणि अन्य पाच मुद्रांक, १०७ धनादेश, व्याज व कर्जाच्या नोंद असलेल्या तीन खतावण्या मिळून आल्या. सावकारीचा परवाना नसतांना संबधितांनी कर्जदारांकडून पाच टक्के दराने व्याज घेऊनही बहुतांश कर्जदारांच्या मालमत्ता कवडीमोल दराने हडप करुन कोट्यवधींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी सावकारांना अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सावकारांचा जाच कायम
सावकाराच्या जाचाला कंटाळून याआधी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या वर्षी सातपूरच्या राधाकृष्णनगर भागात राहणाऱ्या शिराेडे कुटुंबातील तिघांनी याच कारणावरून आत्महत्या केली होती. यामध्ये पित्यासह दोन मुलांचा समावेश होता. नाशिक रोड भागात तशीच घटना घडली. सावकारी जाचाला कंटाळून दोन भावांनी विष घेतले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये खासगी सावकारांच्या बेकायदा वसुलीने त्रस्त झालेल्या सिडकोतील दाम्पत्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती.