नाशिकरोड विभागातून जाणाऱ्या अत्यंत गजबजलेल्या नाशिक-पुणे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नाशिक – नाशिकरोड विभागातून जाणाऱ्या अत्यंत गजबजलेल्या नाशिक-पुणे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अवजड वाहनांविरूध्द वाहतूक विभागाने कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
नाशिकरोड परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे. वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अत्यंत दाट वस्ती असलेल्या, परिसरातील शाळा, व्यावसायिक संकुले, नागरी वस्त्या, मुद्रणालय, औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या संख्येने रहदारी असलेल्या या रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाढलेल्या वाहतुकीमुळे अनेक अपघात झाले आहेत. अलिकडेच पंचवटीत मिरची हॉटेलजवळ झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालये, कर्मचारी आस्थापनांच्या भरण्या-सुटण्याच्या वेळी रहदारीत वाढ होऊन व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण होऊन वाहतूक सिग्नलचे नियोजन ढासळते. परिणामी बिटको पॉईंट, दत्त मंदिर, बिटको महाविद्यालय, शिखरेवाडी कॉर्नर, म्हसोबा मंदिर, सेंट झेवियर्स स्कूल, उपनगर सिग्नल येथे अवजड वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून सर्वसामान्यांना रस्ता ओलांडतांना आणि प्रवास करतांना आपला जीव सांभाळत प्रवास करावा लागतो.
ज्यांच्यावर नियम लागू करण्याची जबाबदारी आहे त्या परिवहन अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने अवजड वाहनांचा मुक्त संचार या रस्त्याने सुरू असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. परिसरातील मोटवानी रोड, जेलरोड या कॉलनी रस्त्यांवरूनही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू आहे. या वाहनांमुळे मोठया प्रमाणावर धूळ उडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अपघात नित्याचे झाले आहेत. प्रशासनाने वाहतूक नियंत्रण सिग्नलच्या वेळेचे नियोजन, रहदारीच्या वेळेस वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सर्वसामान्य जनतेचा जीव वाचवावा, अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेतर्फे परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. याप्रसंगी नाशिकरोड विभागाचे अध्यक्ष विक्रम कदम, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे, कामगार सेना चिटणीस प्रकाश कोरडे आदी उपस्थित होते.