नाशिक: अधिकमासामुळे त्र्यंबकच्या अर्थचक्राला गती; देवस्थानकडून देणगी दर्शन बंद

त्र्यंबक राजाचे दर्शन, कुशावर्त स्नान, ब्रह्मगिरी, संत निवृत्तीनाथ समाधी दर्शन असे धार्मिक पर्यटन सुरू असल्याने त्र्यंबकच्या आर्थिक चक्राला गती लाभली आहे.

नाशिक – यंदा अधिकमास आल्याने त्र्यंबक नगरी गजबजण्यास सुरूवात झाली आहे. त्र्यंबक राजाचे दर्शन, कुशावर्त स्नान, ब्रह्मगिरी, संत निवृत्तीनाथ समाधी दर्शन असे धार्मिक पर्यटन सुरू असल्याने त्र्यंबकच्या आर्थिक चक्राला गती लाभली आहे. त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता देवस्थानच्या वतीने देणगी दर्शन बंद ठेवले आहे.

सध्या अधिकमास सुरू आहे. अधिक मासाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्व आहे. या काळात अधिक प्रमाणावर दानधर्म केला जातो. नदी स्नानासही विशेष महत्व दिले जाते. यादृष्टीने नाशिक येथील गोदाकाठ तसेच त्र्यंबकेश्वर येथे सध्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कुशावर्तावर स्नान करुन परिसरातील त्र्यंबकराजाचे दर्शन, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी दर्शन, ब्रह्मगिरी परिक्रमा असे धार्मिक पर्यटन सुरू आहे. देशाच्या विविध भागातून आलेले भाविक वेळेअभावी ब्रम्हगिरी परिक्रमेपेक्षा त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यास अधिक महत्व देतात. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी राहत असल्याने रांगेतच भाविकांचा अधिक वेळ जातो. त्र्यंबकेश्वराचे मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजले आहे.

हे वाचले का?  चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर.

भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे सकाळी होणारे गर्भगृहातील दर्शन आणि देणगी दर्शन बंद करण्यात आले आहे. केवळ रांगेत दर्शन सुरू आहे. करोना काळात मंदिरे बंद होते, तेव्हा देवस्थानच्या वतीने आभासी पध्दतीने त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुरू होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तेही बंद असल्याने तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घेण्याशिवाय पर्यटक तसेच भाविकांकडे पर्याय नाही. भाविकांच्या वर्दळीमुळे शहराच्या आर्थिक चक्राला गती प्राप्त झाली आहे. शनिवार, रविवार गर्दीचा उच्चांक मोडला जातो. भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे पूजा साहित्य विक्रेत्यांपासून हाॅटेल, लाॅजचा व्यवसाय भरभराटीस आला आहे.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

विकास कामे रखडली

खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून त्र्यंबकेश्वर परिसरात काही विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु, काही वर्षापासून ही कामे सुरू असतांनाही ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. यामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात नारायण नागबळी किंवा अन्य विधी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या इमारतीचे बांधकाम सुरू असतांनाच गळू लागले आहे. हे काम निकृष्ट झाले असल्याची तक्रार करण्यात येत आहे. या शिवाय गंगासागर, इंद्रतीर्थ यासह तीन ते चार तलावांच्या सुशोभिकरणाचे काम थांबले आहे. वाहनतळाचे कामही रखडले असून ब्रह्मगिरी परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी बांधलेले विश्रामगृहासह अनेक कामे अपूर्ण आहेत.

हे वाचले का?  नाशिक महापालिकेची सिटीलिंक बससेवा पावणेदोन वर्षात १० वेळा ठप्प; पगार वाढीसाठी चालक संपावर, हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस