नाशिक : उड्डाण पुलाखाली विक्रेते, वाहनतळांनी विद्रुपीकरण; अतिक्रमण हटविण्याची सूचना

नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाण पुलाखालच्या भागात अनधिकृत विक्रेते तसेच अनधिकृत वाहनतळामुळे उड्डाणपुलाखाली विद्रुपीकरण होत आहे. रस्ता खराब झाल्याने अपघातदेखील होत आहे.

नाशिक – शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाण पुलाखालच्या भागात अनधिकृत विक्रेते तसेच अनधिकृत वाहनतळामुळे उड्डाणपुलाखाली विद्रुपीकरण होत आहे. रस्ता खराब झाल्याने अपघातदेखील होत आहे. त्यामुळे महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांनी एकत्रितपणे काम करून हे अतिक्रमण हटवावे. रस्त्याची सुधारणा व पुलाखालील भागात सुशोभिकरणाची कामे तातडीने करावी, अशी सूचना अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना केली.

भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी एनएचआयचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे उपायुक्त नितीन नेर, सहायक सुरेंद्र वाघ आदी उपस्थित होते. शहरातील उड्डाण पुलाखाली मुंबई नाका ते आडगाव नाका परिसरात अनधिकृत विक्रेते व वाहन तळामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी विक्रेत्यांकडून कचरा तिथेच टाकला जातो. त्यामुळे सुशोभिकरणाच्या कामाचे नुकसान होत असून परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण तातडीने दूर करावे, असे त्यांनी सूचित केले. उड्डाण पुलाखालील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्त्यांबरोबर महामार्ग व त्याला समांतर सेवा रस्त्यांवर खड्ड्यांमुळे बिकट स्थिती आहे. मुसळधार पाऊस झाला नसताना रस्त्यांची चाळणी होत आहे. महामार्गाप्रमाणे महापालिकेने अंतर्गत प्रमुख रस्ते व कॉलनी रस्त्यांवरील दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज मांडली जात आहे.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

द्वारका, मुंबई नाका चौकांची रुंदी कमी करा

शहरातील विविध भागांना जोडणाऱ्या मुंबई नाका आणि द्वारका चौक परिसरात वाहनधारकांना कोंडीला सामोरे जावे लागते. यावर आजवर अनेक उपाययोजना केल्या गेल्या. परंतु, ही समस्या अद्याप सुटलेली नाही. मुंबई नाका चौकातील बेटाचा आकार इतका विस्तीर्ण आहे की, रस्त्याला कमी आणि बेटाला अधिक जागा दिली गेल्याचे दिसते. अभ्यास गटाच्या मदतीने मुंबई नाका व द्वारका चौकातील बेटांचा आकार कमी करावा. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना भुजबळ यांनी केली.

हे वाचले का?  द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक