नाशिक उपकेंद्रांच्या वाढीव बांधकामासाठी तीन कोटी मंजूर; संकुलात अनेक अभ्यासक्रम सुरू होणार

विद्यापीठ कायद्यानुसार भविष्यात उपकेंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती विद्यापीठ निधीतून केली जाईल, असेही आश्वासित केले गेले.

नाशिक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नाशिक उपकेंद्र सक्षमीकरणाचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नाशिक उपकेंद्रांच्या वाढीव बांधकामासाठी तीन कोटींचा निधी मंजूर करण्यासह मनुष्यबळ भरती धोरण, उपपरिसर मंडळ नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे दिंडोरीतील शिवनई येथे सुरू असलेल्या उपकेंद्रांच्या भव्य वास्तूत वाढीव १० हजार चौरस फुटाचा एक मजला बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी दिली.

उप परिसर मंडळावर संस्थाचालक गटातून व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, प्राचार्य गटातून महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मनमाडचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, प्राध्यापक गटातून मविप्र संस्थेच्या आयएमआरटीचे प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या पाच वर्ष कालावधीसाठी असून विद्यापीठ कायद्यानुसार ही महत्त्वाची समिती आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

बैठकीत नाशिक संकुलात पुढील वर्षी सुरू करण्यात येणाऱ्या बीबीए शिक्षणक्रमासह डेटा सायन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्ससह माहिती तंत्रज्ञान, संशोधन विषयातील काही अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. लवकरच कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉ.पराग काळकर हे नाशिक दौरा करणार असून नाशिकच्या उद्योग क्षेत्राशी चर्चा करून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन घेणार आहेत. बैठकीत नाशिक उपकेंद्रात आवश्यक असलेल्या मनुष्यबळ भरतीविषयी सादर करण्यात आलेला डॉ.राजेंद्र विखे पाटील आणि सागर वैद्य यांच्या समितीचा प्रस्तावही संमत करण्यात आला. यानुसार विद्यापीठ कायद्यानुसार भविष्यात उपकेंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती विद्यापीठ निधीतून केली जाईल, असेही आश्वासित केले गेले. तसेच सध्याच्या मनुष्यबळाचा आढावा घेऊन सुधारणाही केली जाणार आहे. सध्या मंजूर ११ पैकी केवळ पाच पदे भरली गेली आहेत. उर्वरित रिक्त सहा पदे भरण्यासंदर्भात आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या या निर्णयांमुळे नाशिक, अहमदनगर उपकेंद्राच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात विद्यापीठाचे संकुल सक्षम, विद्यार्थीभिमुख होईल. अमृत महोत्सवी वर्षात विद्यापीठाच्या नावलौकिकाला साजेसे भव्य संकुल निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. – सागर वैद्य (व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)