नाशिक: एका विवाहाची चर्चा.. करोनातील विधवेला उच्चशिक्षित युवकाची साथ

करोना काळात विधवा झालेल्या महिलेचा विधवा हक्क संरक्षण अभियानाच्या सहकार्याने वैदिक पध्दतीनुसार विवाह पार पडला.

नाशिक: सध्या लग्नांचा धुमधडाका सुरु असून विवाहांवर खर्च करण्यात जणूकाही चढाओढ सुरु आहे की काय, असे एकेका मंगल कार्यालयातील डामडौल पाहून वाटते. अशा या वातावरणात त्र्यंबकेश्वरात झालेल्या विधवा पुनर्विवाहाची सध्या चर्चा सुरु आहे. करोना काळात विधवा झालेल्या महिलेचा विधवा हक्क संरक्षण अभियानाच्या सहकार्याने वैदिक पध्दतीनुसार विवाह पार पडला.

करोना काळात पहिल्या दोन लाटेत मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली. अनेक महिला विधवा झाल्या. घरातील कर्ता पुरूष गेल्याने आर्थिक, मानसिक, शारीरिक दुष्टचक्रात अडकल्या. हा चक्रव्यूह भेदण्यासाठी अनेक विधवांनी मानसिक आधाराची, जोडीदाराची गरज असल्याचे सांगितले. विधवा हक्क संरक्षण अभियान विधवांच्या हक्कांसाठी काम करीत आहे. करोनामुळे विधवा झालेल्यांच्या पुनर्विवाहासाठी अभियानाने पुढाकार घेतला आहे. विधवा हक्क अभियान वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यासाठी प्रयत्न करत आहे.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

पुणे येथील अभियानाच्या कार्यकर्त्यांनी एका विधवेच्या विवाहासाठी वर संशोधनास सुरूवात केली. त्याच वेळी पुणे येथील त्यांच्या ओळखीतील एक युवक लग्नासाठी मुली पाहत होता. त्याला ओझर येथील २७ वर्षाच्या विधवेचे स्थळ सुचविण्यात आले. तिला एक दोन वर्षाची मुलगी असून करोनात तिच्या पतीचे निधन झाले असल्याची माहिती संबंधित युवकास देण्यात आली. वास्तविक, त्या युवकाचे पहिलेच लग्न असतानाही त्याने विधवेशी लग्न करण्यास होकार दिला. दोन्ही कुटूंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. दोघांनी एकमेकांना पसंत केले.

हे वाचले का?  नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

मुलगी ओझरची आणि मुलगा पुण्याचा. उच्चशिक्षीत युवकाच्या कुटूंबातील सदस्यांनी त्र्यंबकेश्वर येथे वैदिक पध्दतीने विवाह करण्याचे ठरवले. रविवारी त्र्यंबकेश्वर येथे दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. दोघांनी सुखी संसाराच्या आणाभाका घेतल्या. यावेळी विधवा हक्क संरक्षण अभियानाचे प्रमोद झिंजाडे, राजू शिरसाठ, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी उपस्थित होते. विधवांच्या हक्कांसाठी समाजाने पुढाकार घ्यावा, त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे, त्यांच्या भावनांचा आदर करा, असे आवाहन झिंजाडे यांनी केले आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव